बुलडाणा : गाव ते गाव आणि जिल्हा ते जिल्हा कनेक्ट करणाऱ्या रस्त्यांवरील जीर्ण झालेल्या पुलांमुळे वाहतुकीस अडथळा येत होता. आता मात्र हा अडथळा दूर होणार असून, जिल्ह्यातील तब्बल दहा पूल बांधण्यात येणार आहेत. या पुलांच्या बांधकामासाठी मंजुरात मिळाली असून, दहा टक्के निधीही प्राप्त झाला आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात जिल्ह्यात दहा पूल नव्याने उभे राहणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलडाणाअंतर्गत नाबार्ड कर्ज साहाय्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दहा प्रमुख जिल्हा मार्गांवरील दहा पुलांचे बांधकाम रखडले होते. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, जिल्ह्यातील नेत्यांनी शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता या पुलांच्या निर्माणाचा प्रश्न निकाली निघाला आहे. जिल्ह्यातील तब्बल दहा पुलांच्या बांधकामामुळे गाव ते गाव आणि जिल्हा ते जिल्हा कनेक्ट होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या पुलांच्या निर्माण कार्यासाठी दहा टक्के निधीही प्राप्त झाला आहे.
या मार्गावर उभे राहणार पूल
मार्ग एकूण किंमत (लाख) प्राप्त निधी (लाख)
माकोडी, तळणी, शेलापूर ८४.८८ १४.४०
बोराखेडी, पोफळी, पिंपगावदेवी ८९.४४ १५.१७
बोराखेडी, पोफळी, पिंपगावदेवी १२९.१३ २१.९१
पारध, धाड, सावळी, साकेगाव १५०.२३ २५.४९
पारध, धाड, सावळी, साकेगाव १५०.९० २५.६०
देऊळगाव, साकर्शा-उमरा १९८.०५ ३३.६०
कळपविहीर, शिवणीपिसा ११९.४० २०.२६
देवखेड, तांदुळवाडी ९९.८४ १६.९४
पोफळ ,शिवणी, वाघाळ २२०.६० ३७.४३
एकूण किंमत १२४२.४७ २१०.८०
महिनाभरात कामाला होणार सुरुवात
या पुलांच्या बांधकामासाठी नाबार्ड कर्ज साहाय्य योजनेंतर्गत दहा टक्के निधी प्राप्त झाला आहे. या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून, येत्या महिनाभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
केंद्रीय मार्ग निधीतून रस्तेही लखलखणार
नाबार्ड योजनेंतर्गत दहा पुलांच्या बांधकामांना मंजुरी मिळाली असतानाच केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत जिल्ह्यातील राहेरीजवळील रस्त्यावरील मोठ्या पुलाचे बांधकाम आणि ११ रस्त्यांच्या दुरुस्तीसह या निधी योजनेंतर्गत आणखी दहा पुलांच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे, तर काही रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरुस्तीकरण करण्यात येणार आहे. या कामांना मंजुरी मिळाली असून, लवकरच निधी प्राप्त होणार असल्याची माहिती आहे.