बुलडाणा : धाडसी दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या अट्टल दरोडेखोरांची टोळी रस्त्यातील ट्रॅक्टरमधील डिझल चोरताना गावकर्यांच्या नजरेस पडली आणि गावकर्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. या दरोडेखोरांना पोलीस पकडतील म्हणून देऊळगावराजा, अंढेरा, चिखली पोलिसांना सतर्क करण्यात आले; मात्र या तीनही पोलीस स्टेशनच्या पोलिसांसह बुलडाणा मुख्यालयातील सर्वच पथकांना हुलकावणी देऊन हे दरोडेखोर एसटीत बसून फरार झाले. अखेर देऊळगावमहीजवळ एसटी बस अडवून तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. हा थरार गुरुवारी सकाळी ३.३0 ते ५ वाजेपर्यंत चालला. यासंदर्भात माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील सात अट्टल दरोडेखोर हे क्रूझर क्र. एमएच २५ आर-३१३९ मधून बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा मार्गे दाखल झाले. देऊळगावराजावरून चिखलीकडे येत असताना त्यांनी टाकरखेड भागीले येथील बाळासाहेब पुरूषोत्तम देशमुख यांच्या ट्रॅक्टरमधील डिझेल चोरण्याचा प्रयत्न केला. ही बाब देशमुख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावकर्यांना उठविले. तेवढय़ात जवळपास सहा ते सात दरोडेखोर क्रूझरमध्ये बसून चिखलीकडे निघाले. देशमुख व त्यांच्या सहकार्यांनीसुद्धा स्वत:च्या चारचाकी गाडीने या दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी देऊळगावराजा, आंढेरा, चिखली पोलिसांना सतर्क केले; मात्र दरोडेखोरांनी या सर्व पोलिसांना हुलकावणी दिली व बुलडाण्याकडे निघाले होते.
२५ जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल
टाकरखेडपासून पाठलाग करण्यात आलेल्या दरोडेखोरांपैकी सचिन बापू शिंदे, सुनील कालिदास शिंदे आणि राजू गुलाब काळे रा. कातरखानी ता.वाशी जि.उस्मानाबाद या तिघांना देऊळगावराजा पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता या अट्टल दरोडेखोरांविरूद्ध जवळपास २५ जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती ठाणेदार हिवाळे यांनी दिली. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक दिघावकर, अति. पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शे. समिर देऊळगावराजा येथे दाखल झाले होते.