मोताळा : तालुक्यातील लिहा येथील बाजाराचा व्यवसाय आटोपून दुचाकीवर घरी परत येताना रोही (निलगाय) या प्राण्याच्या जबर धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सिंदखेड लपाली घाटीजवळ आज १७ जुलैच्या संध्याकाळी साडेसात वाजता घडली.मिळालेल्या माहितीनुसार धामणगाव बढे येथील शे. युसूफ शे. रमजान (वय ३६), शे. आरीफ शे. रमजान (वय ३0) तथा शे. युसूफ यांचा मुलगा शे. अशपाक (वय १४) हे तिघे गुरुवारी संध्याकाळी लिहा बु. येथील बाजाराचा व्यवसाय आटोपून हिरो होंडा क्रमांक एम.एच.१९ जी ११३९ ने मोताळाकडे परत येत होते. दरम्यान, सिंदखेड लपालीनजीक रोही (निलगाय) प्राण्यांचा कळप रस्ता ओलांडत असताना एका रोहीची जबर धडक दुचाकीला बसली. या धडकेत दुचाकीवरील तिघे रस्त्याच्या खाली फेकल्या गेले व गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच धा. बढे येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती केले. वन्यप्राण्यांचा रस्त्यावरील मुक्त वावर दिवसेंदिवस वाढला असून, बुधवारी संध्याकाळी वाहनाच्या धडकेत काळवीट ठार झाले होता.
‘रोही’ची दुचाकीला धडक; तीन जखमी
By admin | Published: July 19, 2014 12:22 AM