मेहकर (बुलडाणा) : गेल्या २0 ते २५ दिवसांपासून मौजे चायगाव फिडरवरील शेतकर्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने शेतकर्यांचे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असून, त्रस्त झालेल्या शेतकर्यांनी शेवटी वीज वितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा संबंधित वरिष्ठ अधिकार्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.शेतकर्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २0 ते २५ दिवसांपासून मौजे चायगाव फिडरवरील शेतकर्यांचा विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शेतकर्यांचे खरिपाचे कापूस व रब्बीचे गहू, हरभरा, मका हे पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे; तसेच यापूर्वी अपुर्या पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालेले आहे. शेतकर्यांना विद्युत पुरवठा खंडित असल्याने पिण्यासाठी पाणी नाही तर जनावरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही वीज वितरण विभागाला लेखी पत्र देण्यात आले; मात्र संबंधित अधिकार्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित अधिकार्यांनी तत्काळ विद्युत पुरवठा सुरु न केल्यास विद्युत पोलवर चढून तथा वीज वितरण कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर माजी नगरसेवक इंगळे, सिद्धेश्वर काळे, जीवन डुरे, भानदास बंगाळे, सुरेश भिसे, विनोद भिसे यांच्यासह ३२ जणांच्या सह्या आहेत.
चायगाव येथे रोहित्राचा वीजपुरवठा बंद
By admin | Updated: December 11, 2014 01:23 IST