लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: रोहयोच्या निकृष्ट काम प्रकरणाची फेरचौकशी करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ज्येष्ठ नेते मधुकर गवई यांनी १६ सप्टेंबर रोजी दिला आहे.मेहकर तालुक्यात ग्रामीण भागात विकास व्हावा, यासाठी सन २0१५-१६ या काळात रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक गावांमध्ये शेतरस्ते, नाला सरळीकरण, शेततळे यासह इतरही कामे झालेली आहेत. या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यावेळी रोजगार हमी योजनेची कामे करण्यास बुलडाणा जिल्हय़ात मेहकर तालुका दुसर्या क्रमांकावर होता; परंतु झालेल्या या कामातून नेमका कोणाचा फायदा झाला, हे मात्र नागरिकांना समजलेच नाही. काही ठिकाणची कामे ही सुव्यवस्थित झाली असली तरीदेखील इ तर अनेक ठिकाणी झालेली रोजगार हमीची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. थातूरमातूर कामे करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी लाखो रुपये हडपल्याची आजही नागरिकांमध्ये चर्चा आहे. सदर निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, यासाठी त्यावेळी अनेकांनी रीतसर व वस्तुनिष्ठ तक्रारी केल्या होत्या. तर काही पक्षाच्या पदाधिकार्यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलनेही केली होती. त्यावेळी सदर प्रकरण चांगले गाजले होते. रोजगार हमी कामांच्या चौकशीसाठी अधिकार्यांची नेमणूकही करण्यात आली होती. परंतु संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी अगदी समजुतदार पणाने सदर प्रकरण हाताळून कोठेही वाच्यता होऊ न देता प्रकरण थंड केले होते; मात्र कागदोपत्री जरी अधिकार्यांनी चौकशी केली असली तर पण रोजगार हमी, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, अशी चर्चा आजही सुरूच आहे. रोजगार हमीच्या या कामात अनेक अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व माजी लोक प्रतिनिधी हे गब्बर झाले आहेत. त्यामुळे रोजगार हमीच्या सन २0१५-१६ च्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ज्येष्ठ नेते मधुकर गवई यांनी दिला आहे.
नियमांचे उल्लंघन, जेसीबीने केली कामेमेहकर तालुक्यात सन २0१५-१६ मध्ये रोजगार हमीची कोट्यवधीची कामे झालेली आहेत. ग्रामीण भागातील गरीब मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे; परंतु झालेली कामे ही संपूर्णपणे नियमबाहय़ झाली असून, मजुरांची खोटी-नाटी नाव टाकून सहय़ा करून मजुरांना कामे न देता जेसीबीने कामे करून लाखो रुपये ठेकेदार व संबंधित अधिकार्यांनी हडपल्याच्या तक्रारी झाल्या होत्या; परंतु कारवाईच्या नावाने बोंबाबोंब आहे.
गटविकास अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपमेहकर तालुक्यात रोजगार हमीची कोट्यवधीची कामे झालेली आहेत; परंतु बहुतांश कामे ही निकृष्ट दर्जाची झाली असून, शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. हा सर्व प्रकार पं.स. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, रोजगार सेवक यांच्या नियोजनबद्ध संगनमताने झाल्याने कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरून या कामासाठी स्वतंत्र समिती नेमून चौकशी करा, अशी मागणी मधुकर गवई यांनी केली.
चौकशीचे नेहमीच भिजत घोंगडेपंचायत समिती अंतर्गत गेल्या ५ ते ६ वर्षांच्या काळात ग्रामीण भागात सिंचन विहिरी, धडक विहिरी, रोजगार हमीची कामे, घरकुल, शौचालय बांधकाम आदी कामे होत अस ताना ज्या ठिकाणी निकृष्ट कामे झाली अथवा होत आहेत, त्या ठिकाणच्या अनेक वेळा तक्रारी पंचायत समितीला येता त; मात्र हा सर्व प्रकार संबंधितांच्या संगनमताने चालत असल्याने चौकशीचे नेहमीच भिजत घोंगडे असते. याची वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी आहे.