रोजगार हमी योजनेतील तालुक्यातील मजुरांना गत १ ऑगस्टपासून काम मिळालेले नाही. याबाबत गणेश देशमुख यांनी सुमारे ४० मजुरांच्या स्वाक्षरीनिशी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने कामाची मागणी करण्यासाठी संबंधित गावातील रोजगार सेवक टाळाटाळ करतात. याबाबत तहसीलमधील रोहयो कार्यालयाकडे धाव घेतली असता, हे कार्यालयदेखील गत दीड महिन्यापासून बंद असल्याने कुचंबणा होत आहे. दरम्यान, रोजगार सेवकांकडून चार हप्त्यांपैकी एका हप्त्याची रक्कम द्या, अशा प्रकारची मागणी होत आहे, जॉब कार्ड बनविण्यासाठीदेखील प्रत्येकी एक हजार रुपयांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
आंदाेलनाचा इशारा
या योजनेतील मजुरांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, विधवा, निराधारांचा समावेश असून, गत दीड महिन्यापासून हाताला काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली असल्याने तातडीने याबाबत कारवाई करावी, नियमित काम उपलब्ध करून द्यावे; अन्यथा आमच्या आत्महत्येस पूर्णपणे शासन जबाबदार राहील, असा इशारा गणेश देशमुख यांनी दिला आहे.
या निवेदनावर सुमारे ४० मजुरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.