धामणगाव धाड : कोरोनाची दुसरी लाट भयानक ठरली असून, शासनाच्या व्यवस्थेचा बोजवारा उडविला आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन करीत कोविड-१९ संक्रमण रोखण्यात खाकी वर्दीतील माणसे समाजासाठी रात्रं-दिवस झटत आहेत.
उन्हाळ्याची काळजी नाही, पाण्यापावसाची फिकीर नाही, गणपती असो की ईद, मोर्चा असो की निवडणुका, आता जिवाची बाजी लावून कोरोनाच्या संसर्गातही बंदोबस्तात आपली सेवा देत आहेत. कोरोना संक्रमनाला आळा घालण्याच्या बंदोबस्तात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. पोलीस भरती परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सामान्य नागरिक ते कर्तव्यदक्ष पोलीस, असे परिवर्तन खडतर प्रशिक्षणानंतर हाेते. सण, उत्सव निवडणुका सर्व बंदोबस्त यशस्वीरीत्या राबविण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. आता एक वर्षापासून कोरोनाने त्यांचा कौटुंबिक जीवन हिसकावून घेतला आहे. आपला जीव धोक्यात टाकून खाकीतला माणूस गर्दी रोखणे, उगाचाच विनास्माक रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करणे, त्यांना समज देणे आदी कामे करीत आहेत. समाजासाठी १२-१२ तास अहोरात्र काम करीत आहेत. आपल्यापासून चुकीने घरच्यांना संसर्ग होऊ नये म्हणून अनेक पोलिसांनी आपले कुटुंब गावाला पाठविले आहे. पोलिसांचे हे कर्तव्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महत्त्वाचे ठरले आहे़