लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पेट्रोलसारखे अतिज्वलनशील पदार्थ वापरताना सुरक्षितता बाळगावी लागते; परंतु पेट्रोल पंपावरच नियमांचे उल्लंघन वाढले आहे. बुलडाण्यातील काही पेट्रोल पंपावर बॉटल व कॅनमध्ये पेट्रोल दिल्या जात असल्याने ग्राहकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी खुलेआम बॉटल घेऊन रांगा लावत असल्याचा प्रकार १0 ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आला आहे. पेट्रोल, डिझेल यासारखे अतिज्वलनशील पदार्थ हाताळण्यासाठी मोठी खबरदारी घेणे गरजेचे असते. त्यामुळे हजारो लीटर पेट्रोलचा साठा असलेल्या पेट्रोल पंपावरील दुर्घटना टाळावी यासाठी पेट्रोल पंपावर अनेक नियम लावून दिलेले आहेत. दिवसेंदिवस दुचाकी किंवा चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या मागणीतही वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेट्रोल पंपांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर वाढलेली आहे; परंतु शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पेट्रोल पंप चालविताना सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन मुख्य कंपन्यांचे पेट्रोल पंप जिल्ह्यात सर्वाधिक आहेत. या तीनही कंपन्या सरकारच्या नियंत्रणाखाली चालतात. त्यामुळे त्या कंपन्यांच्या पेट्रोल पंपांसाठी काही मार्गदर्शन तत्त्वे आहेत; परंतु त्यांचे पालन कितपत होते, याची तपासणीच सदर कंपन्यांच्या अधिकार्यांकडून होत नसल्याने पेट्रोल पंपावर नियमांची पायमल्ली खुलेआम केल्या जात आहे. बॉटल किंवा कॅनमध्ये पेट्रोल देण्यासाठी पेट्रोल पंप चालकांना निर्बंंध घालण्यात आले आहेत; मात्र बुलडाण्यातील काही पेट्रोल पंपावर बॉटल व कॅनमध्ये पेट्रोल देऊन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे समोर आले आहे. बुलडाण्यातील एका पेट्रोल पंपावर पाण्याच्या बॉटलमध्ये खुलेआम पेट्रोल विक्री केली जात असल्याने त्या ठिकाणी गाड्याऐवजी ग्राहकांनी बॉटर घेऊन पेट्रोल खरेदीसाठी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. या प्रकारामुळे पेट्रोलपंपावर होत असलेला गैरप्रकार चव्हाट्यावर येत आहे.
पेट्रोल पंपावर मोबाइलबंदीकडे दुर्लक्ष पेट्रोल पंपावर मोबाइल वापरण्यास बंदी आहे; मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचारीच या मोबाइलबंदीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. पेट्रोल विक्रीच्या वेळेस हे कर्मचारी सर्रास मोबाइल वापरतात. तसेच पेट्रोल पंपावर कर्मचार्यांसह ग्राहकही मोबाइलवर बोलताना आढळून आले. त्यामुळे पेट्रोल पंपांवर सुरक्षेच्या नियमांना मूठमाती दिल्या जात आहे.
‘मार्केटिंग गाइडलाइन्स’चे पालन नाही!विविध कंपन्यांच्या पेट्रोल पंपांसाठी ‘मार्केटिंग गाइडलाइन्स’ ठरवून दिलेले आहेत; परंतु त्यांचे पालन होते किंवा नाही, याची तपासणीच अधिकार्यांकडून होत नाही. त्यामुळे बुलडाण्यातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोलियम कंपन्यांच्या ‘मार्केटिंग गाइडलाइन्स’चेही पालन केल्या जात नाही. या प्रकारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.