- अनिल गवईखामगाव : आध्यात्मिक गुरू राष्ट्रसंत स्व. भय्यूजी महाराजांनी खामगावात सुरू केलेल्या सूर्योदय पारधी आश्रम शाळेच्या मदतीला संघाचे स्वयंसेवक धावून आलेत. संघ स्वयंसेवकांच्या मदतीतूनच यापुढे या आश्रमशाळेच्या विस्तार आणि विकास करण्यात येणार असून, आश्रमशाळेसाठी बांधण्यात आलेल्या नूतन वास्तूच्या लोकार्पणासाठी ९ सप्टेंबर रोजी सरसंघचालक मोहन भागवत यांची खामगाव येथे उपस्थिती लाभणार आहे.आध्यात्मिक गुरू स्व. भैय्युजी महाराजांच्या प्रेरणेतून खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथे पारधी समाजातील मुलांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे. या आश्रमशाळेचा गेल्या काही वर्षांपासून संघ स्वयंसेवकांकडून विस्तार आणि विकास करण्यात येत आहे. यासाठी पुणे येथील संघ स्वयंसेवक अनिरुद्ध देशपांडे यांच्या पुढाकारातून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी नूतन वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना इतरही सुविधा पुरविण्यात येत आहेत. यासाठी स्व. भैय्यूजी महाराज हयात असताना एक करारपत्रही करण्यात आले.सद्यस्थितीत इमारत फळास आली असून, या इमारतीचे ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल. यावेळी आश्रम शाळेतील पारधी समाजातील विद्यार्थ्यांशी सरसंघचालक मोहन भागवत हितगूज देखील साधणार आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, सरसंघचालकांच्या स्वागतासाठी रजतनगरी सज्ज होत आहे. लोकार्पणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सरसंघचालक खामगावतील एका स्वयंसेवकाच्या घरी सायंकाळचे जेवण सुद्धा घेतील. मात्र, सरसंघचालकांच्या या नियोजित कार्यक्रमाबद्दल अतिशय गोपनीयता पाळल्या जात आहे. पारधी समाजाचा मेळावा!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सजनपुरी येथील सूर्योदय पारधी आश्रमशाळेत पारधी समाजाचा हितगूज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात संघर्षातून पुढे गेलेल्या पारधी समाजातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात येईल.स्व. भैय्युजी महाराजांच्या इच्छेनुसार संघाची मदत!खामगाव येथील सजनपुरी भागातील सूर्योदय पारधी आश्रमशाळेचा विस्तार आणि विकास करण्याचा आग्रह स्व. भैय्युजी महाराजांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे धरला होता. त्यानुसार गेल्या चार-पाच वर्षांपासून संघ स्वयंसेवकांकडून सूर्योदय पारधी आश्रमशाळेत संघाच्या स्वयंसेवकांकडून विविध विकासकामे केली जाताहेत.सजनपुरीतील आश्रमशाळा टाकणार कात!भैय्युजी महाराजांनी सुरू केलेल्या सूर्योदय पारधी आश्रम शाळेला आता संघ आणि संघ स्वयंसेवकांची मदत मिळणार आहे. थोडक्यात संघाच्या ह्यटॉनिकह्णने आश्रमशाळा कात टाकणार असून, या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच पारधी समाजाचा सर्वांगिण विकास घडवून आणल्या जाणार आहे.
खामगावातील सूर्योदय पारधी आश्रमशाळेला संघाचे 'टॉनिक'!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 4:05 PM