- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यातून आजपर्यंत २ हजार ९९८ अर्ज आले आहेत. अर्ज भरताना आपल्या स्वत: च्या घराचे स्थान दाखविण्यासाठी रहिवासी पुराव्यावरील पत्ता व शाळा आणि घराचे अक्षांश, रखांश याचा विचारही करावा लागतो. मात्र नकाशामध्ये घराचे निश्चित स्थान मिळत नसल्याने आरटीईचे अर्ज भरताना पालकांना अडचणी येत आहेत.२५ टक्के मोफत प्रवेशाचे आॅनलाइन अर्ज भरण्यास ५ मार्चपासून सुरूवात झाली आहे. यासाठी पालकांना विविध कागदपत्रांची जुळवा-जुळव करावी लागत आहे. तर अर्ज भरताना विविध किचकट बाबी पूर्ण कराव्या लागत आहेत. दरम्यान, पाल्यांचे आरटीई फॉर्म भरत असताना आपल्या स्वत: च्या घराचे स्थान निश्चित करताना रहिवासी पुराव्यावरील पत्ता पाहूनच नकाशात स्थान निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी गुगल नकाशावर राहत्या घराचे अचूक ठिकाण निवडून ‘लोकेशन बलून’ राहत्या घरावरच दर्शवावा लागतो. जोपर्यंत आपल्या निवासाच्या घरावर बलून (चिन्ह) दिसून येत नाही, तोपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. सध्या अर्ज भरताना आपल्या राहत्या घराचे अचूक ठिकाण गुगल नकाशावर मिळून येत नाही. अर्ज भरताना घराचे व शाळेचे अंतरही महत्त्वाचे समजल्या जाते. परंतू अक्षांश व रेखांश शोधण्यासही अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातील अनेक घरांचे निश्चित स्थान गुगल नकाशावर मिळत नाही. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया अर्धवटच राहत आहे. या व्यतिरिक्त सुद्धा काही अडचणी आॅनलाइन अर्ज भरताना येत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आॅनलाईन अर्ज विहित मुदतीत न भरल्यास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशास फटका बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातून तीन हजार अर्जजिल्ह्यात आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २२० शाळा पात्र ठरविण्यात आल्या आहेत. तर २ हजार ९२९ जागा भरण्यात येणार आहेत. ५ मार्चपासून आजपर्यंत २ हजार ९९८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये आॅनलाइन २ हजार ९९४ व मोबाईल अॅपद्वारे अवघे चार अर्ज आले आहेत.