लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : स्थानिक सामान्य रुग्णालयात कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत आरोग्य सुविधांमध्ये भर पडली असून, दोन ऑक्सिजन प्लांट, तर एक ‘आरटीपीसीआर’ प्रयोगशाळाही उभारली आहे. घाटाखालील सर्वच तालुक्यातील कोरोना स्वॅबची तपासणी येथे केली जाणार असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यास मदत होणार आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना बसला. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. यामध्ये घाटाखालील खामगाव, मलकापूर आणि नांदुरा तालुक्याचा समावेश होता. दुसऱ्या लाटेत अधिक संख्येने रुग्ण आढळून आल्याने, तसेच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यावर भर देण्यात आला. खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हवेतील ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्लांट उभारण्यात आले. यामधील एक प्लांट कार्यान्वित झाला असून, दुसरा प्लांट लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. याशिवाय ३०० जम्बो सिलिंडर आणि २६ ड्युरा सिलिंडरही रुग्णालयात उपलब्ध असून, साध्या वार्डात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दुसरीकडे या प्रयोगशाळेमुळे आरोग्य विभागावरील ताण कमी होईल.
सामान्य रुग्णालय, खामगाव येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडच्या संख्येत भर पडली आहे. ऑक्सिजनचे दोन प्लांट उभारले असून, आरटीपीसीआर लॅब पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवाय तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता बालकांसाठी कोविड हॉस्पिटलमध्ये बेड तयार ठेवले आहेत. - डॉ. नीलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधिकारी, खामगाव.