सिंदखेडराजा : देशाचा राज्यकर्ता घाबरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी राजधानीत काटेरी तारेचे कुंपण घातले जात आहे, अशी खरमरीत टीका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.
राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त जयंत पाटील सोमवारी सिंदखेडराजा येथे होते. मेहकर व सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी पदाधिकारी बैठकीत बोलताना पाटील यांनी जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यात पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी वैनगंगेचे पाणी नळगंगेपर्यंत आणण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. सिंदखेडराजासारख्या पवित्र ठिकाणी येऊन समाधान झाल्याचे सांगून त्यांनी या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने केलेला शेतकरी कायदा या देशातील शेतकऱ्यांना मानवणारा नाही, राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी केंद्र सरकारला अनेकवेळा चांगले सल्ले दिले होते मात्र त्याकडे मोदी सरकारचे लक्ष नाही, असे ते म्हणाले. मोदी सरकारने कंपनी कायद्यात बदल करून तीनशेपेक्षा जास्त कामगार संख्या असलेल्या कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याही पुढे जाऊन हे सरकार दीड हजार पेक्षा कमी संख्या असलेल्या कारखान्यांवर बंदीची वेळ आणणार आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढणार असल्याचे भाकीत त्यांनी केले. राज्यातील विरोधकांवर त्यांनी टीका केली.
कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवा अध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काजी, विविध आघाड्यांवर प्रदेशाध्यक्ष यावेळी उपस्थित होते.