बुलडाणा : ग्राम स्वराज अभियानअंतर्गंत गरिब कुटुंबियांची सर्वात जास्त असलेल्या जिल्ह्यातील २२ गावामध्ये स्वच्छ भारत दिवस निमित्त स्वच्छतेचा जागर करण्यात आला. या अभियानअंतर्गंत संबंधित पंचायत समितीला जिल्हा परिषद प्रशासनाकडून एक दिवस सूचना देण्यात आल्याने तसेच १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीय असल्यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाल्याचे दिसून आले. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या निर्देशानुसार ५ मे २०१८ पर्यंत जिल्ह्यात ग्राम स्वराज्य अभियान राबवण्यात येणार आहे. अभियान राबवण्यासाठी जिल्ह्यातील गरीब कुटुंबांची संख्या जास्त असलेल्या २२ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये प्रभावीपणे हे अभियान राबवण्यात यावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी दिल्या आहेत. या अभियानामध्ये १८ एप्रिल रोजी स्वच्छ भारत दिवस, २० एप्रिल रोजी उज्ज्वला दिवस, २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत दिवस, २८ एप्रिल रोजी ग्राम स्वराज्य दिवस, ३० एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस, २ मे रोजी किसान कल्याण दिवस व ५ मे रोजी आजीविका दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच २४ एप्रिल पर्यंत पोषण अभियान राबवण्यात येत आहे. दरम्यान २४ एप्रिल रोजी निवडलेल्या गावांमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार असून या विशेष ग्रामसभेमध्ये पंचायत दिनाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, सुकन्या योजना, अटल पेन्शन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, प्रधानमंत्री पिक विमा योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, आम आदमी बिमा योजना आदींची माहिती देण्यात येणार आहे.
या गावात राबविण्यात आले स्वच्छता अभियान
ग्राम स्वराज्य अभियानासाठी जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कालखेड, पाळोदी, तरोडा कसबा, नांदुरा तालुक्यातील पिंपळखुटा धांडे, दहीवडी, मलकापूर तालुक्यातील बहापूरा, खामगाव तालुक्यातील पोरज, लोखंडा, पळशी खु, बोरी, आसा, मेहकर तालुक्यातील थार फदार्पूर, मारोतीपेठ, उमरा, बुलडाणा तालुक्यातील साखळी खु, चिखला, देऊळगांव राजा तालुक्यातील सावंगी टेकाडे, बोराखेडी बावरा, सिंदखेडराजा तालुक्यातील मोहाडी, गोरेगाव, राजेगांव, सोयंदेव या गावांची निवड करण्यात आली असून संबंधित पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
चिखला येथे स्वच्छ भारत दिनाचे उद्घाटन
बुलडाणा पंचायत समितीअंतर्गंत चिखला व साखळी खु. या गावांचा स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गंत निवड करण्यात आली. त्यापैकी चिखला येथे १८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता स्वच्छ भारत दिनाचे उद्घाटन सरपंच मिराताई मुकेश वाघ, उपसरपंच परमेश्वर इंगळे, ग्रामपंचायत सदस्य पवन भरत वाघ, गिरीष सुरेश वाघ, अर्चना दिलीप वाघ, स्वाती गणेश वाघ, मिरा विजय सुरूशे, लक्ष्मी तुळशीदास इंगळे, विस्तार अधिकारी डि.एम.जाधव, ग्रामपंचायत सचिव गणेश भोंडे व चिखला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.