लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असताना मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागही कोरोनाच्या विखळ्यात सापडला आहे. तालुक्यातील वडगाव माळी, जानेफळ, डोणगावनंतर आता अंजनी गावातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना २१ जुलै रोजी आरोग्य विभागाने क्वारंटीन केले आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग आता वाढलेला आहे. लॉकडाऊन काळामध्ये प्रतिदिन ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडले आहेत. त्यात केवळ शहरी भागातच रुग्ण सापडत नसून ग्रामीण भागातही आता कोरोनाचा शिरकाव वाढला आहे. २० जुलै रोजी सायंकाळी प्राप्त कोरोना अहवालापैकी ८९ कोरोना अहवाल आले आहे, तर १३ पॉझिटिव्ह सापडले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १०४ अहवाल प्राप्त झाले होते. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील १० व रॅपिड टेस्टमधील तीन अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ४६ तर रॅपिड टेस्टमधील ४३ अहवालांचा समावेश आहे. पॉझीटीव्ह आलेले अहवालामध्ये खामगांव येथील ६० वर्षीय पुरूष, नांदुरा रोड ५३ व २४ वर्षीय पुरूष, देशमुख फैल ६५ वर्षीय महिला, पिपळगाव राजा येथील ३६, ३८, २३, ५५ वर्षीय पुरूष, ११ वर्षीय मुलगी, अमृत नगर ५४ वर्षीय पुरूष पॉझिटिव्ह आढळले आहेत. मेहकर तालुक्यातील अंजनी येथील ६० वर्षीय महिला, चिखली येथील गांधी नगर ७१ वर्षीय पुरूष, ५७ वर्षीय पुरूष पॉझिटिव्ह आला आहे. मेहकर तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. डोणगाव येथे आतापर्यंत सहा कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यातील दोन जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत अंजनी येथे पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. परंतू येथील एक महिला पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरातील गावांमध्ये खळबळ उडाली आहे. या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यास सुरूवात झाली आहे. सकाळपासून पाच व्यक्तींना क्वारंटीन करण्यात आले आहे. डोणगाव परिसरातील एका गावांमध्ये आणखी दोन पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती आहे.
मेहकर तालुक्यातील ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 4:13 PM