लोकमत न्यूज नेटवर्क
किनगाव जट्टू : कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने पहिलीपासून आठवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, याची काळजी घेत आता ग्रामीण भागातील काही पालकच मुलांच्या हातात वह्या, पेन्सील, पाटी देऊन बाराखडीची उजळणी घेत आहेत. तसेच शुद्धलेखन गिरवत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील काही घरांमध्ये पाहायला मिळत आहे. शिक्षकाची भूमिका बजावताना पालकांची मात्र चांगलीच कसरत होत आहे. यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच कोरोना आजाराने थैमान घातले आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून शाळा उघडण्यात आलेल्या नाहीत.
. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरू केले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काही शाळांमध्ये नववीपासून पुढील वर्ग सुरु झाले असून, यावेळी कोरोनाविषयक सर्व नियम पाळून या मुलांची शिकवणी सुरू आहे. मात्र, पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग बंदच आहेत. काही प्राथमिक व माध्यमिक शाळांचे कर्तव्यदक्ष शिक्षक आठवड्याचा अभ्यास देऊन दर आठवड्याला या अभ्यासाची तपासणी करतात. असंख्य जागरूक पालकही आपल्या मुला-मुलींचे हित लक्षात घेऊन घरीच जमेल तशी मुला-मुलींकडून बाराखडी उजळणी, शुद्धलेखन व इतर अभ्यास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.