बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, निकालही जाहीर करण्यात आले आहेत. आता ९ हजार २२९ उमेदवारांना निवडणुकीचा खर्च महिनाभरात सादर करावा लागणार आहे. त्यामुळे विजयीसह पराभूत उमेदवारांनाही खर्चाची माहिती गाेळा करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली आहे. २८ ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत, तसेच ४९८ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीसाठी रिंगणातील उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे आदेश निवडणूक आयाेगाने दिले हाेते. शेवटच्या दिवसात उमेदवारांना बँक खाते उघडण्यात अडचणी आल्या हाेत्या. त्यानंतर निवडणूक आयाेगाने शिथिलता दिली हाेती. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता जिल्ह्यातील विजयी उमेदवारांसह पराभूत उमदेवारांना निवडणुकीचा खर्च प्रशासनाला सादर करावा लागणार आहे. हा खर्च सादर न केल्यास उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार असते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांसह पराभूत उमेदवारांनाही आता निवडणुकीचा खर्च सादर करावा लागणार आहे. त्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.
८७० ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर हाेणार
ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. सन २०२० ते २०२५ दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित होणाऱ्या सरपंचपदांचे आरक्षण २७ जानेवारी २०२१ रोजी तहसीलस्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार हे निश्चित करणार आहेत, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रियांकरिता व खुल्या प्रवर्गांतर्गत स्त्रियांकरिता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २९ जानेवारी रोजी स. ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे.
अधिसूचना प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ
ग्रामपंचायत निवडणुकीची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिसूचना जारी करण्याची तारीख २१ जानेवारी हाेती. निवडणूक आयाेगाने यामध्ये मुदतवाढ दिली असून, आता २९ जानेवारीपयर्यंत अधिसूचना जारी करता येणार आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागात लावण्यात आलेली आदर्श आचारसंहिताही संपुष्टात आली आहे.