अंढेरा (बुलडाणा): येथील गणेश भानुदास सानप (१९) या युवकाचा मृतदेह काल ४ ऑक्टोबर रोजी दुपारी परिसरातील एका शेतात आढळून आला होता; मात्र त्या युवकाची आत्महत्या नसून, हत्याच झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्यामुळे मृत युवकाचा भाऊ रामेश्वर सानप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रेयसीसह तिघांवर आज गुन्हा दाखल केला.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृत गणेश सानपचे गावातील एका तरुणीबरोबर गेल्या दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. हे जेव्हा तरुणीच्या वडिलाला माहीत झाले, तेव्हा त्यांनी गणेशच्या परिवाराला धमक्या देणे सुरू केले; मात्र तरीही हे प्रेम प्रकरण सुरू होते. या दरम्यान ३ ऑक्टोबर रोजी गणेश सानप हा शेतात जातो म्हणून गेला, तो परत आला नाही. त्यानंतर गावातील शिवानंद कारभारी सानप यांना शिवारात गणेशची मोटारसायकल, मोबाईल पडून असल्याचे आढळले. त्यांना संशय आल्यामुळे याची कल्पना रामेश्वर सानप यांना देण्यात आली. तेव्हा ग्रामस्थ आणि कुटुंबातील सदस्यांनी गणेशचा सर्वत्र शोध घेतला; मात्र दुसर्या दिवशी ४ ऑक्टोबर रोजी गणेशचा मृ तदेह शिवारातील शेतात आढळून आला. या प्रकरणी मृत गणेशचा मोठा भाऊ रामेश्वर सानप यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी अंढेरा येथील किरण सानप, तिचे वडील भगवान सानप, आई आणि अज्ञात व्यक्तीवर आज भादंविच्या ३0२, अधिक ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून, पोलिस कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.
‘त्या’ युवकाची हत्या प्रेम प्रकरणातून
By admin | Published: October 05, 2014 11:53 PM