- नवीन मोदे
धामणगाव बढे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ग्राम परिवर्तन अभियानात ‘ग्राम दुत’ बनून धामणगाव बढे येथील २५ वर्षीय सद्दाम खान या युवकाने औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी या गट ग्रामपंचायतीचा कायापालट केला आहे. विकासाच्या मुख्य प्रवासापासून हे गाव बरेच दूर होते.गाव विकासाच्या निधीवर भ्रष्टाचाराची चढाओढ लागलेली असताना सद्दामचे हे काम सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणारे आहे. ग्राम परिवर्तन अभियानात राज्यातील विविध घटकांना एकत्र आणून माणूस केंद्र बिंदू मानीत त्यास आरोग्य, शिक्षण, रोजगार , पाणीपुरवठा या सामाजिक सुविधां देण्याच्या मानकांनी परिपूर्ण करण्यासाठी राज्यात राबविले जात आहे. २ एप्रिल २०१७ रोजी या अभियानाची सुरूवात राज्यात झाली. त्यात राज्यातील दुर्गम भागातील २४८ गावात १४२ ग्रामदुतांच्या माध्यमातून ग्राम परिवर्तनाची चळवळ राबविण्यास प्रारंभ झाला. याच अभियानात धामणगाव बढे येथील सद्दाम खान या युवकाने कामाचा चांगला ठसा उमटवला. वाणिज्य शाखेचा स्नातक असलेल्या सद्दाम खाने पत्रकारितेचीही पदवी घेतली आहे. ‘जांभळी’ या गावातील नागरिकांना त्याने विकासाची वाट दाखवली. जांभळी ही गट ग्रामपंचायत आहे. येथील लोकसंख्या दोन हजार ८५७ असून गट ग्रामपंचायतीमध्ये जांभळी, चिंचोली, जांभळी वाडी व मेहरबान नाईक तांडा या दुर्गम गावांचा समावेश. गेल्या १९ वर्षापासून या गावात रेशनकार्ड नव्हते, वाहतुकिची व्यवस्था नसल्यामुळे मुले, मुली सातवीनंतर शिक्षणापासून वंचित राहत होती. वैद्यकीय सुविधांचा अभावामुळे नागरिक त्रस्त, पाणीटंचाई, विजेचा प्रश्न, सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव अशा अनेक समस्या येथे होत्या. या गावात ग्रामदुत म्हणून गेलेल्या सद्दाम खान याने प्रथम गावाचा अभ्यास केला. गावकरी, पदाधिकारी यांना विश्वासत घेत प्रशासनाच्या सहकार्याने गावात रेशनकार्ड दिले. विद्यार्थ्यांसाठी गावापर्यंत एसटी पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. टेलीमेडीसीनच्या माध्यमातून आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या. जिल्हा परिषद शाळेमध्ये सोलर उर्जेद्वारे वीज आणली. गावात स्वच्छतेच्या दृष्टीने सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सध्या प्रगतीमध्ये आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नाद्वारे प्रशासनाच्या सहकार्यातून मोठा निधी त्याने गावाच्या विकासासाठी वळविला. त्यामुळे ग्रामस्थांचा सध्या तो जिवलग बनला आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य दिनी ध्वज वंदन करण्याचा पहिला मान त्याला एैन निवडणुकीच्या काळात गावकर्यांनी दिला. इतकेच काय त्याला ग्रामस्थांनी मेसही लावू दिली नाही. दररोज गावातील एका कुटुंबाकडे तो आता जेवन करतो.
मुख्यमंत्र्यांनी चित्रफीत केली ट्विट
ग्राम परिवर्तन मिशन तर्फे एकमेव जांभळी गावाची चित्रफीत बनविण्यात आली आहे. गावकरी आणि सद्दामचे काम यावर ती आधारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगपती रतन टाटा, प्रशासनातील बड्या अधिकार्यांनी ही चित्रफीत पाहली. आणि मुख्यमंत्र्यांनीही ती ट्विट केली आहे.