देऊळगावमही : देउळगाव राजा तालुक्यासह सिंदखेड राजा व लोणार तालुक्यातील नदीकाठच्या गावांसाठी संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशात ३ मे रोजी खडकपूर्णाचे दोन दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. या पाण्यामुळे उन्हाळी पिकांसह अनेक गावांच्या पिण्याचा प्रश्न मिटणार आहे.
देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व लोणार तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना खडकपूर्णा नदीपात्रातील पाण्यावर अवलंबून आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात या तिन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना दरवर्षी पाणी सोडण्यात येते. प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी या गावातील नागरिकांनी पालकमंत्री डॉ़ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे होती. त्यानुसार पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार ३ मे राेजी खडकपूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पातून २.५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग केल्या जाणार आहे, अशी माहिती पाटबंधारे उपविभागीय अधिकारी तिरमारे यांनी दिली. यावेळी जि़ प़ बांधकाम सभापती रियाज खान पठाण, बाजार समितीचे माजी अध्यक्ष नितीन शिंगणे, जिल्हा युवा राष्ट्रवादी अध्यक्ष समाधान शिंगणे व इतर मान्यवर उपस्थित हाेते़