पिंपळगाव सैलानी : विजांचा प्रचंड कडकडाट, धुवाँधार पाऊस, तरीही लाखो भाविकांचा उत्साह कायम असलेल्या वातावरणात बुधवारी रात्री १0.४५ वाजता मजार-ए- शरीफवर जाण्यासाठी भावपूर्ण वातावरणात संदलची मिरवणूक काढण्यात आली. पिंपळगाव सराई येथून निघालेल्या उंटणीवरील या संदलचे दर्शन घेण्यासाठी पिंपळगाव सराई ते सैलानी दर्गा या चार किमी रस्त्यावर भाविकांनी दुतर्फा तोबा गर्दी केली होती. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेली सैलानी यात्रा पाच दिवस चालते. होळी पंचमी अर्थात ६ मार्च रोजी सुरू झालेली ही यात्रा ११ मार्च रोजी निघालेल्या संदल मिरवणुकीने संपली. सैलानी बाबांच्या दरबारात आलेला दु:खी, कष्टी, रोगी, भूत-भानामती, जादू-टोणा झालेला बरा होऊन जातो, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे सैलानी यात्रेत येणार्यांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी सैलानी बाबांचा १0७ वा संदल होता. ११ मार्च रोजी पिंपळगाव सराई येथून मुजावरच्या घरून पारंपरिक पद्धतीने रात्री ८.४५ वाजता राणी नामक उंटणीवरून हा संदल निघाला. एका कटोर्यामध्ये संदल ठेवून सजविलेल्या उंटणीवरून गावाला प्रदक्षिणा घालून ढोल-ताशांच्या निदानात संदल सैलानीबाबांच्या दग्र्याकडे रवाना झाला. यावेळी लाखो भाविक संदलसोबत चालत होते. पिंपळगाव सराई येथून दर्गापर्यंतचा चार किमी प्रवास हा पायी करून १0.४५ वाजता संदल मजार-ए-शरीफवर पोहोचला. तेथे पोहोचल्यानंतर उंटणीवरील कटोरा व त्यामध्ये ठेवलेला गलफ घेऊन पोलीस बंदोबस्तामध्ये मुजावर व त्यांच्या कुटुंबाचे सदस्य दर्गा परिसरात दाखल झाले. येथे शे. रफिक मुजावर, शे. हाशम मुजावर, शे. नजीर मुजावर, शे. चांद मुजावर, शे. शफिक मुजावर, शे. महबूब मुजावर, शे. नईम मुजावर, शे. नाजीम मुजावर, शे. अस्लम मुजावर, शे. मोहसिन मुजावर यांच्या हस्ते संदल मजार-ए-शरीफवर चढविण्यात आला. त्यानंतर दरूद-ए-पाकचे वाचन करण्यात आले.
पावसात निघाली सैलानी बाबांची संदल मिरवणूक
By admin | Published: March 13, 2015 1:46 AM