लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: हिंदु-मुस्लीमांच्या एकतेचे प्रतिक असलेली बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव सराई येथे दरवर्षी भरणारी सैलानी बाबांची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. यावर्षी ही यात्रा २५ मार्च ते पाच एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला उद्रेक पाहता खबरदारीचा उपाय म्हणून तथा साथरोग प्रतिबंधक कायदा तथा आपत्ती व्यवस्थानप कायद्याचा आधार घेत जिल्हाधिकारी एस रामास्वामी यानी या यात्रेस स्थगिती दिली आहे. या यात्रेत राज्यासह देशभरातून जवळपास सहा लाख भाविक येत असतात. वर्तमान स्थितीतच १०० व्यक्तींमागे १८ जण बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीत आढळून येत आहे, यात्रा सुरू ठेवल्यास कोरोनाची बाधा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे हा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे.गेल्या वर्षी यात्रा रद्द झाल्यानंतरही अनेक भाविक सैलानी यात्रेत पोहोचत होते. त्यामुळे पोलिस, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाला मोठी कसरत करून भाविकांना आल्या पावली परत पाठवावे लागेल होते. त्यासाठी ढासाळवाडी, पिंपळगाव सराई, चौफुली, करडी फाटा येथे पथके तैनात करावी लागली होती. त्या पार्श्वभूमीवर सैलानी यात्रेच्या एक महिना अगोदरच अनुषंगीक आदेश जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी काढला आहे.
सैलानी यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:18 AM