लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : सैलानी बाबांच्या यात्रेला होळीपासून सुरुवात झाली असून, सैलानी बाबांच्या दर्गावर गलफ फुलांची चादर चढविण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, मोठ्या श्रद्धेने भाविक सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत.सैलानी बाबांच्या यात्रेत सैलानी बाबांना मनोरुग्ण चांगले होण्यासाठी नवस करीत असतात व तो नवस फेडल्यास मनोरुग्ण चांगले होतात, अशी भावना भाविकांची आहे. त्यामुळे यात्रेत गलफ नारळ, फुले चादर यांची प्रचंड प्रमाणात विक्री होत असते. यासाठी भाविकांच्या रांगाच रांगा दिसून येत आहे. तर सैलानी दर्गा परिसरासह गवळी बाबा, झिरा, वाघजाई, जांभळीवाले बाबा, महादेव मंदिर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी चांगलीच गर्दी असते. या यात्रेसाठी बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील भाविक तसेच राज्याबाहेरील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. यासाठी प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
भाविकांना सुविधांचा अभावसर्व धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांच्या यात्रेला भारताच्या कानाकोपºयातून भाविक प्रशासनाकडून त्यांना कोणत्याच सुविधा मिळत नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सैलानी बाबांच्या यात्रेमध्ये दिवसेंदिवस भाविकांची वाढ होत आहे; परंतु या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी आरोग्य सुविधा, स्वच्छतागृह, स्नानगृह, रस्ते, भाविकांना राहण्यासाठी भक्त निवास, पिण्यासाठी कायमस्वरूपी पाणी व्यवस्था या सुविधा अद्याप येथे पुरविल्या जात नाही. त्यामुळे सैलानी संस्थानचा विकास होताना दिसत नाही. आंध्र प्रदेश, कर्नाटक, हैदराबाद, मध्य प्रदेश, तामिळनाडू, नेपाळ आदी राज्यांतून भाविक सैलानी बाबांच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येथे येतात; परंतु सुविधांअभावी भाविकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने या तीर्थक्षेत्रासाठी ठोस पावले उचलून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी हातभार लावण्याची आवश्यकता आहे.
आ. राहुल बोंद्रे यांनी केली यात्रेची पाहणीसैलानी बाबांच्या यात्रेमध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल बोंद्रे यांनी मुजावर व व्यापारी, करमणूक केंद्राचे मालक यांची भेट घेऊन यात्रेसंबंधी चर्चा केली व सैलानी बाबांच्या दर्गावर गलफ व फुलांची चादर डोक्यावर कटोरा घेऊन चादर चढविली व समाधीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत हाजी हाशम मुजावर, पं.स. सदस्य शे.चांद मुजावर, सरपंच प्रदीप गायकवाड, शेख बबलू, शे. नजीर मुजावर, शे. रफिक मुजावर उपस्थित होते. याशिवाय सैलानी दर्गा येथे विविध क्षेत्रातील मान्यवर येत आहेत. या यात्रेत भाविकांची वाढलेली गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून, आरोग्य विभागातर्फे विविध सुविधा पुरविण्यात येत आहेत.