ब्रह्मानंद जाधव, बुलढाणा : जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यार्थ्यांच्या आश्रम शाळेतील सुमारे ९०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन लांबले आहे. वेतनास होणाऱ्या दिरंगाईमुळे कुणाचा बँकेचा हप्ता, तर कुणाचे घरभाडे थकले आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांवर पगार देता का, पगार? असे म्हणण्याची वेळ आली आहे. सव्वा पाच लाख रुपयां अभावी मानधन लटकले आहे.
प्रत्येक कर्मचाऱ्याचे महिन्याच्या खर्चाचे नियोजन ठरलेले असते. त्यात आश्रम शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन आतापर्यंत झाले नाही. जिल्ह्यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या २२ आश्रम शाळा असून यामध्ये जवळपास ९०० पेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना वारंवार वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. हे वेतन सामाजिक न्याय विभागाअंतर्गत समाज कल्याण कार्यालयातून होत आहे. परंतू वारंवार वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एप्रिल महिन्याचे वेतन झाले आहे. मे महिन्यासाठी मोजकेच अनुदान आले आहे. त्यात सव्वा पाच लाख रुपये कमी आहेत. उर्वरित अनुदानाची मागणी केली असून, ते प्राप्त होताच सर्व आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्यात येईल. -डॉ. अनिता राठोड, सहायक आयुक्त, समाजकल्याण, बुलढाणा.