संदीप वानखडे
बुलडाणा : शिक्षकांचे लसीकरण ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत़. जिल्ह्यात आठवी ते १२वीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या, तरी १२ टक्के शिक्षकांनी लसीकरणाकडे पाठ फिरल्याचे चित्र आहे. त्यामुळे लसीचा एकही डाेस न घेणाऱ्या शिक्षकांचे ऑगस्टचे वेतने थांबविण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी २ सप्टेंबर राेजी दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
काेराेनामुक्त झालेल्या गावांमध्ये सध्या आठवी ते १२ वीपर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे ते सार्वजनिक वाहतुकीचा वापर करीत असल्याने काेराेनाचे वाहक ठरू शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने शिक्षक दिनापर्यंत सर्वच शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार आदेश देऊनही अनेक शिक्षक काेराेना लस घेण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक सचिन जगताप यांनी २ सप्टेंबर राेजी आदेश काढले आहेत. यामध्ये काेराेना लस घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहे, तसेच आतापर्यंत काेराेनाचा एकही डाेस न घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतने थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात १०,९३३ शिक्षक
जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमध्ये एकूण १० हजार ९३३ शिक्षक कार्यान्वित आहेत. यापैकी ६ हजार ८७२ जिल्हा परिषद तर ४ हजार ६१ शिक्षक खासगी शाळांमध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत या शाळांमधील ८८ टक्के शिक्षकांनी काेराेनाची लस घेतली आहे. जवळपास दाेन हजार शिक्षकांनी अजूनही काेराेनाची लस घेतलेली नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सर्व पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी, तसेच सर्व माध्यमाच्या शाळांचे मुख्याध्यापक यांना पत्र पाठविले आहे.
दुसऱ्या डाेससाठी टाळाटाळ
काेराेनाची दुसरी लाट आल्यानंतर अनेकांनी काेराेना लसीचा पहिला डाेस घेतला. त्यानंतर, दुसरा डाेस घेण्यासाठी अनेक जण टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ६५ हजार ७१९ जणांनी काेराेनाची दुसरी लस मुदत संपल्यानंतरही घेतली नसल्याचे चित्र आहे. यामध्ये २,९८९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. १,०८१ आराेग्य कर्मचारी व ६१ हजार ६४९ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला नसल्याचे चित्र आहे.
५ सप्टेंबरपर्यंत सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे शिक्षकांचे लसीकरण करून, त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी आतापर्यंत लसीचा एकही डाेस घेतला नाही, त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षकांनी काेराेनाची लस घ्यावी, ज्यांनी पहिला डाेस घेतला असेल, त्यांनी मुदत संपली असल्यास दुसरा डाेस घ्यावा.
- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प़. बुलडाणा.