बुलडाणा : शहरात पाकिटाद्वारे भेसळयुक्त दुधाची विक्री केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या दुधाचा तुटवडा असल्याने नागरिक मिळेल त्या ठिकाणावरून दूध खरेदी करतात. दुधाच्या तपासणीकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष दिसून येत आहे.
पांदण रस्त्याच्या कामाला निधीचा अभाव
देऊळगाव राजा : तालुक्यातील अनेक पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. शेतमाल आणताना कसरत करावी लागत आहे. अतिक्रमण काढून पांदण रस्ते मोकळे करण्याची गरज आहे. निधीअभावी पांदण रस्त्यांची कामे रखडल्याचे दिसून येते.
धाड येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
धाडे : येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. परिसरात रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिक बिनधास्तपणे बाहेर पडत आहेत. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता प्रत्येकाने नियम पाळणे आवश्यक आहे.
चोरीच्या घटना रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल !
लोणार : तालुक्यात चोरीच्या घटना रोखण्यासाठी काही गावांमध्ये ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी काही नागरिक रात्रीचे जागरण करीत आहेत.
विद्युत पुरवठ्याच्या समस्यांमध्ये वाढ
मेहकर : महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. डोणगाव, लाणीगवळी परिसरात ओव्हरलोड वाढल्याने येथे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. याकडे लक्ष देऊन येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात, तसेच विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.
पशुधन विभागाच्या कामांना खीळ
बुलडाणा : पावसाळ्यात गुरांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. जनावरांना पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची आवश्यकता आहे. परंतु पशुव्यावसायिक संघटनेच्या आंदोलनामुळे पशुधन विभागाच्या अनेक कामांना खीळ बसली आहे.