मेहकरः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लावले आहेत. यानुसार मद्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मेहकर आठवडी बाजारात देशी दारू विक्री सुरू होती. यामुळे येथील देशी दारूच्या दुकानदारास स्थानिक गुन्हे शाखेने ७ मार्चच्या रात्री पकडले. यात ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येथील आठवडी बाजारात असलेल्या देशी दारूच्या दुकानात ७ मार्चच्या रात्री अवैध देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारला. त्यात चंदू मूलचंदानी, जेठानंद खत्री, साबीर खान रहीम खान (सर्व रा. मेहकर) हे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता अवैधरीत्या दुकान उघडून देशी दारू विक्री करीत असल्याचे दिसून आले. आरोपीच्या जवळून १४३ नग देशी दारूच्या बाटल्या अंदाजे किंमत १० हजार १० रुपये व गल्यात असलेले नगदी पैसे १६०० रुपये आणि मोटारसायकल किंमत अंदाजे ६० हजार रुपये असा ७१ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दुकान सील करण्यात आले.
तिन्ही आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोहेका सुधाकर काळे यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार मेहकर पोलीस स्टेशनने तिन्ही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास बिट जमादार गोविंद चव्हाण करीत आहेत.