खामगाव (बुलढाणा) : बनावट कागदपत्राद्वारे बँकेकडे गहाण असलेला फ्लॅट व घराची विक्री करून त्याद्वारे बँकेला १ कोटी ७५ लाखांचा चुना लावल्याप्रकरणी शेगावातील रोकडियानगरातील अरुण विश्वनाथ भटकर, माउली चौकातील जगदंबानगरातील राजेश जगदेव पारखेडे या दोघांवर बँकेच्या तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा शनिवारी दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अकोला येथील जिजाऊ कमर्शियम को-ऑप. बँकेचे शाखाधिकारी मंगेश प्रकाश वसू यांनी शेगाव शहर पोलिसांत शनिवारी तक्रार दिली. त्यामध्ये शेगाव भाग-२ येथील रोकडियानगरातील फ्लॅट व घर बँकेकडे गहाण होते. तरीही आरोपी अरुण भटकर, राजेश पारखेडे यांनी १४ ऑगस्ट २०१८ ते ११ नोव्हेंबर २०१९ या कालावधीदरम्यान बनावट कागदपत्राद्वारे विक्री केल्याचे म्हटले. त्यामुळे बँकेची १ कोटी ७५ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचे नमूद केले. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४६६, ४६८, ४७१ सहकलम १२० (बी) नुसार गुन्हे दाखल केले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगोले करीत आहेत.