--रुग्णालयांशी संलग्न मेडिकलमधूनच औषध घ्यावे--
कोरोनाबाधित रुग्णांसाठीची अैाषधे व रेमडेसिविर इंजेक्शन हे कोविड रुग्णावर उपचाराची परवानगी देण्यात आलेल्या जिल्ह्यातील ९३ रुग्णालयांना संलग्न असलेल्या मेडिकलमधूनच घेण्याचे आवाहन अैाषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त अशोक बरडे आणि औषध निरीक्षक गजानन घिरके यांनी केले आहे. जिल्ह्यात ३२ शासकीय, तर ६२ खासगी रुग्णालयांमध्ये काेविड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
--बहुतांश इंजेक्शन्स पावडर स्वरुपातच--
रेमडेसिविरचे बहुतांश इंजेक्शन्स हे पावडर स्वरुपातच येतात. केवळ सिल्पाने द्रवरूपात गेल्या आठवड्यात रेमडेसिविरचे इंजेक्शन आणलेले आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने हेटेरो, कॅडिला हेल्थ केअर आणि सिप्ला या कंपन्यांचेच रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळतात. याबाबत ग्राहकांनी जागरूक असणे गरजेचे आहे.
--इंजेक्शन सीलपॅक असते--
रेमडेसिविरचे इंजेक्शन सील पॅक असते. त्याला रबरी कॅप असते. तिही एसएसच्या सीलमध्ये असते. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन घेताना नागरिकांनी कोविड रुग्णालयाशी संलग्न मेडिकललाच प्राधान्य द्यावे. काळ्या बाजारातून ते घेऊ नये, असेही औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त अशोक बरडे यांनी स्पष्ट केले.
--सलाइनमध्ये काय असते?--
रुग्णांना देण्यात येणाऱ्या सलाइनमध्ये अर्थात आयव्हीत ०.९ टक्के (एनसीएल) सोडियम क्लोराइड असते. त्याचा वापर अशक्तपणा असल्यास किंवा द्रवरुपातील इंजेक्शन रुग्णांना देण्यासाठी करतात.