- ब्रम्हानंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक वितरण विभागाकडून सुरू करण्यात आलेले मोफत धान्याचे वितरणही अनलॉकमध्येही सुरू आहे. परंतू जिल्ह्यात सध्या रेशनची काळ््या बाजारात विक्री करणारे रॅकेट सक्रीय झाले आहे. मोफत धान्य वाटप सुरू झाल्यापासूनच हा गैरप्रकार वाढल्याचे दिसून येते. गेल्या चार महिन्यामध्ये १६ कारवाया करण्यात आल्या असून, एक हजार २४ क्ंिवटल धान्य पकडण्यात आले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात गोरगरीब नागरिक अन्नधान्यापासून वंचीत राहू नये, यासाठी पुरवठा विभागाकडून मोफत धान्य पुरविण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय योजनेतील व प्राधान्य कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येक व्यक्तिस पाच किलो मोफत तांदुळ महिन्याला दिल्या जातो. त्यानंतर गहू व डाळीचेही मोफत वितरण करण्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम सार्वजनिक पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १ हजार ५३६ रास्त भाव दुकानांमधून धान्याचे नियमीत वितरण करण्यात येत आहे. परंतू मोफत धान्य वितरण सुरू झाल्यापासून त्या धान्याचा काळाबाजारही सुरू झाल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात गेल्या चार ते पाच महिन्यामध्ये पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनाने १६ कारवाया करून काळ्या बाजारात जाणारे धान्य जप्त केले आहे. यातील बहुतांश धान्य हे स्वस्त धान्य लाभार्थ्यांकडून जमा करण्यात आल्याची माहिती तपासामधून समोर आली आहे. लाभार्थ्यांकडून धान्य खरेदीकरून त्याची काळ्या बाजारात विक्री करणारे रॅकेटच जिल्ह्यात तयार झाले असून, पोलीस आणि पुरवठा विभाग संयुक्तपणे या रॅकेटला पकडण्यात व्यस्त आहे.
रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री; रॅकेट सक्रीय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 11:55 AM