- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक नगरपालिका प्रशासनाकडून विलंबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरात खासगी पाण्याच्या विक्रीत वाढ झाली आहे. विहिरीसह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील गळतीतून निघणाऱ्या पाण्याचीही आता खामगावात विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.खामगाव शहराला नगरपालिका प्रशासनाकडून ९ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. यावेळी दूषित पाणी पुरवठ्यामुळे सुरूवातीचे पाणी नागरिकांना नाल्यात सोडावे लागते. परिणामी नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहात नाही. खामगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील व्हॉल्व आणि इतर गळतीच्या ठिकाणी नागरिकांची पाणी भरण्यासाठी गर्दी होते. अनेकजण या ठिकाणाहून पिण्याचे तसेच अन्य वापरासाठी पाणी भरतात. मात्र, ज्यांना येथून पाणी भरणे शक्य होत नाही, त्यांना विकतच्या पाण्याचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात टँकरच्या पाण्याची विक्री वाढली आहे. शहरानजीकच्या विहिरींसोबतच व्हॉल्व गळतीतून निघणारे पाणीही आता विकले जात आहे.
पाच रुपये कॅनप्रमाणे विक्री!खामगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाईनला घाटपुरी रोडवर दोन ठिकाणी गळती लागली आहे. याठिकाणी खामगाव शहरातील नागरिक पिण्याचे पाणी भरतात. त्याचवेळी पाच रुपये कॅनप्रमाणे पाणी उपलब्ध करून देणारेही येथीलच पाण्याचा वापर करतात.
पाणी विक्रीसाठी सायकल, रिक्षाचा वापर!एखाद्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागल्यास रिक्षातून कॅनद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. पाच रूपयाला २० लीटर तर १५० रुपयांना एक हजार लीटर पाणी घरपोच उपलब्ध करून दिले जाते. काहीजण कॅनमधून घरपोच पाणी विकत देत आहेत.