लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: समृद्धी महामार्गालगत सावरगाव माळ,, गोळेगाव व निमखेड येथील १९४४ हेक्टर क्षेत्र नवनगर म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरम्यान, या क्षेत्रातील जमीन तथा झालेल्या विकास कामाचा मोबदला हा पाच जून २०१७ च्या सॅटेलाईट इमेजनुसारच देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाचे झालेले काम मध्यंतरी गुगलने अपडेट केलेल्या मॅपमध्येही दिसत आहे.दरम्यान, मिळणारा मोबदला हा ऐकेरी स्वरुपात राहणार असून पुर्वी तो अडीचपट दिल्या जात होता. मात्र अलिकडील काळात या क्षेत्रात या क्षेत्रात जमिनीशी निगडीत घटक व विकास कामे झाली असल्यास त्या कामांना किंवा जमिनीशी निगडीत घटकांना नुकसान भरपाई दिली जाणार नसल्याचे सिंदखेड राजाचे उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. नवनगरातील जमीन एकत्रीकरणाची प्रारंभीक अधिसुचना एक फेब्रुवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर अनेक भूधारक त्यांचे जमिनीमध्ये फळ झाडे लावणे, बांधकामे करणे, विहीर खोदकाम करणे, जलवाहिनी टाकणे अशा प्रकारची कामे करीत असल्याचे सिंदखेड राजा एसडीओ कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने नव्याने तयार करण्यात आलेल्या कामांना तथा जमिनीशी निगडीत घटकांना कोणतीही नुकसान भरपाई अनुज्ञेय राहणार नाही. त्यामुळे होणाऱ्या नुकसानास भूधारक व्यक्तीश: जबाबदार राहील असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यात साब्रा काबरा परिसरातही आणखी एक नवनगर उभारण्यात येणार आहे. त्याची अधिसुचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. मात्र सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड आणि गोळेगाव या गाव परिसरातील एक हजार ९४४.८५ हेक्टरवर नवनगर उभारण्यासंदर्भातील अधिसुचना प्रसिद्ध झाली आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामडळाला नवनगर विकास प्राधिकरण म्हणूनही घोषित करण्यात आलेले आहे.राज्यातील दहा जिल्ह्यांना थेट मुंबईशी जोडणाºया समृद्धी महामार्गाचे काम सध्या वेगात सुरू असून बुलडाणा जिल्ह्यातून ८७ किमी लांबीचा हा मार्ग जात आहे. पॅकेज क्रमांक सहा आणि पॅकेज क्रमांक सात अशा दोन टप्प्यात जिल्ह्यात या महामार्गाचे काम होत आहे. यासाठी संपादीत केलेल्या जमिनीपोटी शेतकºयाना आतापर्यंत ७०० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. त्यात थेट खरेदीपोटी ६५७ कोटी रुपये देण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
समृद्धी महामार्ग: जून २०१७ च्या सॅटेलाईट इमेजनुसारच मिळणार मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 3:30 PM