- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडली होती. गत काही दिवसांपूर्वीच ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे गत तीन महिने घरामध्ये बसून असलेले पर्यटक बाहेर पडले असून, जंगल भ्रमंतीसाठी गर्दी करीत आहेत. जिल्ह्यात लोणार, सिंदखेड राजा, अंबाबरवा व ज्ञानगंगा अभयारण्य, मैलगड, गोंधनापूरचा किल्ला आदी पर्यटनस्थळे आहेत. लोणार व सिंदखेड राजा येथे जगभरातून पर्यटक येतात. ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्ये गत तीन महिन्यांपासून पर्यटकांसाठी कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र गत आठवड्यात दोन्ही अभयारण्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. गत तीन महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच जण घरात बसून आहेत. बाहेर फिरण्यासाठी कोणतीही मुभा नसल्यामुळे अनेकजण त्रस्त झाले होते. त्यातच ज्ञानगंगा अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यानंतर दररोज पर्यटक अभयारण्यात फिरण्यासाठी गर्दी करीत आहेत. या अभयारण्यात सध्या टी वन वाघाचे वास्तव्य असल्याने वाघाचे दर्शन घेण्याकरिता पर्यटकांची उत्सूकता वाढली आहे. तसेच या अभयारण्यात बिबट, अस्वल, सांबर, चितळ, हरिण, नीलगाय, सायाळ, रानडुक्कर आदी प्राणी आहेत. मोर, पोपट, बदकासह अनेक पक्षीही अभयारण्यात निदर्शनास पडतात.अभयारण्यात फिरण्याकरिता बोथा येथे नोंदणी करावी लागत असून, तेथून वनविभागाच्या जीप्सीमध्ये पर्यटकांना जंगलात सफारीसाठी सोडण्यात येते. जिल्ह्याबाहेरील पर्यटक सुद्धा अभयारण्यात फिरण्यासाठी गर्दी करीत आहेत.
अभयारण्यात फिरण्याचे नियम बदललेज्ञानगंगा अभयारण्यात कोरोनामुळे फिरण्याचे नियम बदलण्यात आले आहेत. एका जिप्सीमध्ये आधी आठ जणांना बसविण्यात येत होते. आता मात्र एका कुटुंबातील असले तर चार आणि वेगवेगळे असले तर दोघांनाच बसविण्यात येते. तसेच अभयारण्यात जाण्यापूर्वी तपासणी करण्यात येत आहे. पर्यटकांनी मास्क लावणे आवश्यक आहे. अभयारण्यात असलेल्या ८ सुटपैकी केवळ दोनच सुट पर्यटकांसाठी राखीव करण्यात येत आहेत.
अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कोरोनामुळे घरात बसून त्रस्त झालेले नागरिक आता फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. दररोज पर्यटक गर्दी करीत आहेत. बोथा येथे नोंदणी करण्यात येत असून, तेथे पर्यटकांची तपासणी केल्यानंतर अभयारण्यात जिप्सीमध्ये फिरविण्यात येत आहे.-संतोष डांगे वनपरिक्षेत्र अधिकारी, ज्ञानगंगा अभयारण्य, बुलडाणा