किनगाव राजा : येथून जवळच असलेल्या हिवरखेड पूर्णा येथील रेती घाटाचा लिलाव झाला असून, या घाटावरून एका राॅयल्टी पावतीवर दिवसभर वाळूची वाहतूक हाेत असल्याची तक्रार सरपंच व नागरिकांनी तहसीलदार सिंदखेड राजा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याप्रकरणी चाैकशी करून कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
हिवरखेड पूर्णा येथील रेती घाटाचा लिलाव झाला आहे. या घाटावरून राॅयल्टीची एकच पावती दाखवून दिवसभर वाहतूक करण्यात येत असल्याने शासनाचा हजाराे रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाने या घाटावर नेहमीसाठी एका कर्मचाऱ्याची ड्युटी लावणे गरजेचे आहे. या घाटावर सीसी कॅमेरे लावण्याची गरज आहे, असे हिवरखेड पूर्णा येथील सरपंच सुनील गोरे यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले. सद्यस्थितीत पूर्णा नदीमध्ये घाटावर हजारो ब्रास रेती उत्खनन झाली आहे. रेती घाटावर क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन हाेत असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण हाेण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी सरपंचांसह ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.