सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केले आहे. परंतु, हे नियम नेमके आहेत कोणासाठी? असा प्रश्न हर्रासी झालेल्या रेती घाटावरील गर्दीकडे पाहिल्यावर पडत आहे. लॉकडाऊन लागल्यापासून हर्रासी झालेल्या रेती घाटावर जिल्हाभरातून हजारो टिप्पर मजूर रेती भरण्यासाठी येत आहेत. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. रेतीघाट ठेकेदार आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे हा प्रकार चालू असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे देऊळगाव मही, निमगाव गुरू या रेती घाटाची हर्रासी झालेली आहे आणि या दोन्ही गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत. याला कारणीभूत हा रेती घाटच आहे. या रेती घाटावर दररोज हजारो लोक बाहेरून येतात. या गर्दीमुळे हा प्रादुर्भाव या भागामध्ये वाढलेला आहे. जिल्हाभरसुद्धा रेती घाट सुरूच आहेत. या गंभीर विषयाकडे जिल्हाधिकारी यांनी तत्काळ लक्ष घालून रेती घाट सील करावे आणि वाढणारा कोरोना प्रादुर्भाव थांबवावा, अशी मागणी होत आहे.
राज्य शासनाने लावलेल्या लॉकडाऊनच्या नियमाचे पालन व्हावे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
अनिल चित्ते, रा. निमगाव गुरू, ता. देऊळगाव राजा.