नदीकाठच्या असेल त्या रस्त्याने सध्या मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी होत असून याचा मोठा फटाका महसूल विभागाला बसत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने नदीकडून येणारे वाळू चोरीचे मार्ग बंद केले आहेत.
सप्टेंबरअखेरपर्यंत अधिकृत वाळू घाट सुरू राहणार असला तरीही पावसाळा सुरू होणार असल्याने पुढील काही दिवसांत वाळू घाट बंद करावे लागणार आहेत. पावसाळ्यात वाळू मिळणार नाही यादृष्टीने सध्या अधिकृत वाळू घाटावरून नियम मोडून वाळूची वाहतूक होताना दिसत आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे खोदून वाळू उपसली जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. प्रशासनासमोर वाळू चोरीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नदीतून मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुंद, अरुंद रस्त्याने सध्या वाळूची वाहतूक होत आहे. पावसाळ्यापूर्वी वाळू साठा करून ठेवायचा आणि पावसाळ्यात जास्त दराने तो ग्राहकांना विकायचा यादृष्टीने ही चोरटी वाहतूक सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या संदर्भात माहिती मिळताच महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यावर नामी उपाय शोधून काढला असून नदीकडे येणारे सर्व चोरटे मार्ग जेसीबी मशीनने खोदून त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे करून ठेवले आहेत. जेणेकरून चोरट्या वाळू वाहतुकीला आळा बसेल. प्रशासनाने केलेल्या या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आले असले तरीही चोरटी वाळू वाहतूक अजूनही जोरात सुरू असल्याचे चित्र आहे.
अधिकृत घाट चालकांकडून नियमांची पायमल्ली
अनधिकृत वाळू उपसा सुरू असला तरीही अधिकृत घाटातूनदेखील नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. अनेकवेळा नियम मोडून वाळू उपसा केला गेल्याने पर्यावरणास मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूल प्रशासन, खनिकर्म विभाग आणि पर्यावरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने हिवर्खेड पूर्णा परिसरातील वाळू घाटात हे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे.