बुलडाणा : आधीच वातावरणामध्ये झालेला बदल, त्यात भाविकांची झालेली प्रचंड गर्दी अशा वातावरणातही पिंपळगाव सराई येथून ११ मार्च रोजी रात्री ८.३0 वाजता सरकार सैलानीबाबा यांचा संदल निघाला. पिंपळगाव सराई येथील शे. रफिक मुजावर, शे.हाशम मुजावर, शे. नजीर मुजावर यांच्या निवासस्थानी विधिवत पूजन झाल्यानंतर सजविलेल्या उंटणीवर कटोर्यात मानाचा गलफ ठेवून ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. पिंपळगाव येथून गेल्या अनेक वर्षांपासून संदल काढण्याची परंपरा आहे. पिंपळगाव ते हाजी अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानीबाबा यांच्या मजार -ए-शरीफपर्यंत जवळपास चार किमी अंतरावरून मिरवणुकीद्वारे संदल काढला जातो. पिंपळगाव सराई ते सैलानी बाबाचा दर्गा हा पाणंद रस्ता होता. त्यामुळे रस्त्यावरून प्रचंड गर्दी होत होती. आता प्रशासनाने हा रस्ता रुंद करून त्याची डागडुजी केल्यामुळे रस्ता प्रशस्त झाला आहे. रात्री निघालेला संदल सकाळी चार वाजेपर्यंत दर्गावर पोहोचत असतो, मात्र आता प्रशासनाची बंधने आल्याने रात्री ११ वाजेपर्यंत संदल दर्गावर पोहचविला जातो.
पिंपळगाव सराई येथून निघाला संदल
By admin | Published: March 12, 2015 1:52 AM