अद्याप याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसला तरी त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातून चार तर तहसीलदारांच्या निवासस्थानातील दोन झाडे चोरट्यांनी लंपास केली आहेत. विशेष म्हणजे ही झाडे तोडण्यासाठी आधुनिक चेन सॉ चोरट्यांनी वापरल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त होत आहे. ही झाडे तोडून परिपक्व झालेली अर्थात ७५ ते ८५ सेमीचा घेर असलेलीच चंदनाची झाडे या चोरट्यांच्या रडावर असतात. या घटनेमध्ये ही बाब स्पष्ट होत आहे.
यापूर्वी बुलडाणा शहरातील शासकीय निवासस्थानांच्या जागी असलेल्या चंदनाच्या झाडांची यापूर्वी अशाच पद्धतीने चोरी झालेली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे निवासस्थान असो की जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर स्टेट बँकेचा परिसर असो, या भागात यंत्रणेलाच आव्हान देत अशा पद्धतीने यापूर्वी चंदनाच्या झाडांची चोरी झालेली आहे. त्यामुळे चंदन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. खुल्या बाजारात चंदनाच्या परिपक्व खोडाला मोठी मागणी व किंमत आहे. त्यातून चंदनाच्या झाडांची ही चोरी होत आहे.
अज्ञात चोरट्यांनी तहसीलदार रूपेश खंडारे यांच्या ‘कोटपूर्णा’ या निवासस्थानातून १ जुलैच्या मध्यरात्री दोन आणि अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या ‘संत चोखामेळा’ निवासस्थानातून चार अशी सहा चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेली. याबाबत बुलडाणा शहर पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली असून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदर रूपेश खंडारे यांनी दिली.
-- चोरट्यांचे आव्हान--
अजिंठा पर्वतरांगा तथा पैनगंगा नदीच्या प्रवाहासोबत समृद्ध झालेल्या नदीकाठच्या पट्ट्यातील चंदनाची झाडे नेहमीच चंदन तस्करांच्या रडारवर राहिली आहे. चिखली तालुक्यातील अंबाशी परिसर तसेच मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठाच्या परिसरात प्रामुख्याने याआधी चंदनाच्या झाडांची चोरी केली जात होती. आता या भागात चंदनाची झाडे दुर्मीळ झाली आहेत. त्यातच बुलडाणा शहरातही कधीकाळी चंदनाच्या झाडांची संख्या अधिक होती. मात्र चोरट्यांनी ही झाडे टार्गेट केल्याने शहरातील या झाडांचीही संख्या कमी झाली आहे. चंदन चोरट्यांवरही पोलीस प्रशासनाकडून अलीकडील काळात मोठी कारवाई झालेली नाही.