हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत गावे हगणदरीमुक्त होण्यासाठी जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमां तर्गत प्रत्येक गावातील शौचालय बांधकामाचा वेग तिप्पट वाढविण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायती अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जबाबदार अधिकारी मुक्कामी राहणार असून, लोकप्रतिनिधी स्वच्छता सेवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत.सदर अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शासनाने नियुक्त केलेले अधिकारी किंवा कर्मचार्याच्या मार्गदर्शनाखाली अभियान काळात स्वच्छ तेविषयी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था व स्वयंसेवी संस्थांचा स्वच्छता सेवेमध्ये सक्रिय सहभाग वाढविणे व श्रमदानात सहभागी करून घेणे, गावात स्वच्छता दिंडी आयोजित करणे, श्रमदानातून शौचालयाच्या खड्डय़ांचे लाइन आउट देऊन प्रत्यक्ष काम करणे, गावातील कुटुंबीयांना भेटी देणे, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक, निगराणी समितीमार्फत शौचालय वापराबाबत जनजागृती करणे, शाळा, अंगणवाड्यांना भेटी देऊन स्वच्छ शाळा दिवस पाळणे, प्रभात फेरीचे आयोजन करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र येथे स्वच्छता अभियान राबविणे, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो आदी सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता मोहीम राबविणे, साप्ताहिक बाजाराच्या ठिकाणी समूह शौचालय यांची देखभाव दुरुस्ती करणे, प्रसार माध्यमाद्वारे जनजागृती करणे, शाळा, महाविद्यालयात स्वच्छता कार्यक्रमाबाबत निबंध, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे.
जबाबदार अधिकारी राहणार गावात मुक्कामी‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वयाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच तालुका स्तरावरील विविध विभागातील वर्ग- १, वर्ग- २ व वर्ग- ३ चे अधिकारी व कर्मचारी यांना जिल्ह्यातील एक एक गाव नेमून देण्यात येणार आहे. या गावात नियुक्त अधिकारी किंवा कर्मचारी रात्री मुक्कामी राहणार असून, अभियान कालावधीत किमान दोन वेळा भेट देऊन प्रत्येक भेटीत किमान तीन तास स्वच्छता या विषयावरील विविध उपक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे.