बुलडाणा : पीक विम्याचा लाभ देण्याच्या मागणीसाठी आमदार डाॅ. संजय कुटे १६ सप्टेंबर राेजी आक्रमक झाले हाेते. त्यांनी मंत्रालयातच ठिय्या आंदाेलन सुरू केले हाेते. राज्य शासनाच्या वतीने येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने आमदार कुटे यांनी आपले आंदाेलन तीन तासांनी स्थगित केले़
शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासंदर्भात १ सप्टेंबर राेजी कृषीमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली हाेती. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व आमदार तथा खासदार उपस्थित हाेते. त्यावेळी १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याची मागणी आमदार डाॅ़ संजय कुटे यांनी केली हाेती. तसेच मागणी मान्य न झाल्यास १६ सप्टेंबरपासून आंदेालन सुरू करण्याचा इशारा दिला हाेता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत लाभ न मिळाल्याने आमदार संजय कुटे यांनी १६ सप्टेंबर राेजी मंत्रालयातच शेतकऱ्यांबराेबर ठिय्या आंदाेलन सुरू केले हाेते. या आंदाेलनाची दखल घेत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी आमदार कुटे यांच्याबराेबर चर्चा केली. तसेच येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन दिल्याने आमदार कुटे यांनी आंदाेलन स्थगित केले. १५ दिवसांत हा प्रश्न निकाली निघाला नाही, तर १६ व्या दिवशी पुन्हा आंदाेलन करण्याचा इशारा यावेळी कुटेंनी दिला.
शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याच्या मागणीसाठी आज मंत्रालयात ठिय्या आंदाेलन सुरू केले हाेते. कृषी विभागाने १५ दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदाेलन स्थगित केले. कृषी विभागाने हा प्रश्न निकाली न काढल्यास आंदाेलन आणखी तीव्र करण्यात येईल.
डाॅ. संजय कुटे, आमदार