- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: उमलते वय हे कोऱ्या पाटी सारखे असते. त्यावर काहीही लिहीले ते उमटते. चांगले काय, वाईट काय, हे आपणच त्या बालकाला शिकवत असतो. आपल्या वागण्यातून ते बालक अनुकरण करत असते. त्यामुळे बालवयातच योग्य संस्कार घडणे महत्वाचे आहे. उमलत्या वयात चांगले संस्कार न झाल्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात, असे मत संकेश्वर पीठाचे (कर्नाटक) शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ते बुलडाणा येथे नवदुर्गा यज्ञ सोहळा व पुन: प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त आले असता त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न: नवीन वर्ष केव्हा साजरे करावे?
उत्तर: १ जानेवारी हे इंग्रजांचे नवीन वर्ष आहे, ते आपले नवीन वर्ष नाही. आपल्या संस्कृतीचे नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होते. त्यामुळे १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करू नये. आपण गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरे केले पाहिजे. ३१ डिसेंबर ही इंग्रजांची वर्षअखेर आहे. या दिवशी तरुणांचा व्यसनाधीन होऊन चालणारा धिंगाणा ही वाईट प्रवृत्ती समजल्या जाते. संस्काराचा अभाव असल्याने असे व्यसनाधीन होऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले आहेत.
प्रश्न: मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार मिळतात का?
उत्तर : आज शाळा शिक्षण देण्याचे काम चांगल्या परिने पूर्ण करत आहेत. परंतू मोठ-मोठ्या शाळा मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार देऊ शकत नाहीत. संस्कार देण्यामध्ये ह्या शाळा कमी पडत आहेत. परिणामी, उमलत्या पिढीला शिक्षण मिळते पण संस्कार मिळत नाही.
प्रश्न: शाळेत कोणत्या शिक्षणाची आवश्यकता आहे?
उत्तर: मुलांना संस्कार देण्याची गरज धर्म पूर्ण करू शकतो. म्हणून शाळेत नैतिक मूल्यांचे धर्मशिक्षणही देणे आवश्यक आहे. कर्नाटकमधील संकेश्वर पीठ हे शृंगारीचे मुख्य पीठ आहे. संकेश्वर पीठामार्फत लहान मुलांना नैतीक व धार्मिक शिक्षण देण्याच काम केले जाते. आज मुलांना नैतिक व धार्मिक शिक्षण देण्याची आवश्यकता आहे.
प्रश्न: धर्मपीठांचे कर्तव्य काय आहे?
उत्तर: आजच्या धर्मपीठांनीही उमलत्या पिढीवर नीतिमूल्यांचे संस्कार रुजवण्याचे काम कर्तव्य म्हणून बजावले पाहिजे. मुलांना संस्कारक्षम करणे हे धर्मपीठांचे मोठे कर्तव्य आहे. कच्च्या मातीलाच आकार दिला जाऊ शकतो, त्याप्रमाणे उमलत्या वयात झालेले संस्कार हे आयुष्यभर टिकून राहतात. म्हणून उमलत्या वयात संस्कारांची खरी गरज आहे. ही गरज धर्मपीठांमधूनही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावे.
प्रश्न: ताण-तणावातून मुक्तता मिळविण्यासाठी काय करता येईल?
उत्तर: सध्याचे समाजजीवन हे वाढलेल्या अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी येणारे ताण-तणाव यामुळे असमाधानी बनले आहे. आणि म्हणून समाधान शोधण्यासाठी सध्या लोकांचा कल धार्मिक वा आध्यात्मिक उपक्रमांकडे वाढलेला आहे, हे मला माझ्या भ्रमंतीमध्ये ठळकपणे लक्षात आले. ताण-तणावातून मुक्तता मिळविण्यासाठी आध्यात्मिक मार्ग पत्करला पाहिजे.
प्रश्न: राम मंदिराविषयी काय सांगू शकाल?
उत्तर: राम मंदिराच्या प्रश्नाकडे राजकीय चष्म्यातून बघितल्या जाऊ नये. राजकारणामुळेच मंदिर प्रश्नाचा खरा विचका झालेला आहे. दोन्ही धर्मांच्या धर्मगुरूंनी जर आपसात संवाद साधला तरच हा प्रश्न सगळ्यांचे समाधान होऊन निकाली निघू शकतो. परंतु त्यासाठी दोन्ही धर्मांच्या धर्मगुरूंची चर्चा करण्याची तयारी हवी. अगोदरच्या काही चर्चा निष्फळ ठरल्या म्हणजे पुढे निष्फळ ठरतील असे नाही, आशावाद हा महत्वाचा आहे.