काशीनाथ मेहेत्रे । लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या ४२0 व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १२ जानेवारी रोजी सकाळी ५.४५ वाजता अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर जनसागर उसळला होता.प्रारंभी सकाळी सूर्योदयापूर्वी राजे लखोजीराव जाधव यांचे सतरावे वंशज गणेशराव राजे जाधव, राजूकाका राजे जाधव, बाळूराजे जाधव, इंजिनिअर अभिजित राजे जाधव, विजय जाधव, बाळासाहेब राजे जाधव, डिगांबर राजे जाधव, संजय राजे, सतीश राजे जाधव, नीलेश भोसले यांनी परिवारासह जिजाऊ मासाहेबांचे पूजन करून पुष्पहार घालून जिजाऊ मासाहेबांना अभिवादन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्यावतीने जिजाऊंना अभिवादनराष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. पंचायत समितीमधून ढोल-ताशांच्या गजरात सर्वांना भगवे फेटे बांधून जिजाऊंचा जयघोष करीत सदर रॅली राजवाड्यात सकाळी ७ वाजता पोहोचली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उमा तायडे, उपाध्यक्ष मंगला रायपुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद यंडोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे यांच्यासह सभापती राजू ठोके, उपसभापती दीपा जाधव, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, सर्व जि.प., पं.स. सदस्य संवर्ग विकास अधिकारी सुळे यांच्या हस्ते जिजाऊंचे पूजन करून जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.
ग्रामीण भागातही जिजाऊंना अभिवादनबुलडाणा तालुक्यातील ग्रामीण भागातही माँ जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी हतेडी, बिरसिंगपूर, देऊळघाट, डोंगरखंडाळा, पाडळी, भादोला, कोलवड, सागवन आदी ठिकाणी शाळेतील मुलांनी रॅली काढून माँ जिजाऊंचा जयघोष केला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.