मालेगाव - शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे मालेगाव शहरात मंगळवारी (26 जून ) सकाळच्या सुमारास आगमन होताच भाविकांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सगळीकडे ‘जय गजानन आणि गण गण गणात बोते’चा गजर झाल्याने मालेगावनगरी दुमदुमून गेली होती. सकाळी 8 वाजता मालेगाव शहरात पालखी दाखल झाली. पालखी आल्याबरोबर पाण्याच्या टाकीजवळ फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. मालेगाव शहरातील पालखी मार्गाने जाणा-या रस्त्यावर भाविकांनी सडा-सारवण करून संपूर्ण रस्त्यावर भव्य अशा रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. पालखीमध्ये 700 वारकरी, रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर यसह सर्व व्यवस्था संस्थानामार्फत आणण्यात आली. पालखीमध्ये शिस्तबद्धरीत्या पांढरा अंगरखा घातलेले 700 वारकरी हातात टाळ मृदुंग आणि भगवे झेंडे घेऊन असल्याने पालखी सोहळा लक्षवेधी ठरत आहे.
पालखीचे आगमन झाल्यावर पंचायत समितीच्या प्रांगणात पालखीतील भाविकांना पंचायत समितीचे कर्मचारी, अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या वतीने नाश्ता देण्यात आला. यावेळी पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यानंतर पालखी प्रमुख मार्गाने शिव चौक, गांधी चौक, जैन मंदिरासमोरून मेडिकल चौक, जुन्या बस स्टॅन्ड मार्गे माहेश्वरी भवन येथे मार्गस्थ झाली. येथे मुंदडा परिवारातर्फे भोजनाची व्यवस्था केली होती. तीन पिढ्यांपासून मुंदडा परिवाराकडून भोजन व्यवस्था केली जात असून, यावर्षीही परंपरा कायम ठेवण्यात आली. दुपारी सदर पालखी शिरपूरकडे मार्गस्थ झाली.