गजानन कलोरे / शेगाव(जि. बुलडाणा)टाळ, मृदंगाचा गजर, गुलाल, पुष्पांची उधळण करीत सनई-चौघड्यांच्या मंगलमय ध्वनी अन् अडीच लाख भक्तांच्या मुखातून निघणारा रामनामाचा जयघोष, अशा भावविभोर वातावरणात शेगावात श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. लाखो भक्तांच्या मांदियाळीने व तेराशे नऊ भजनी दिंड्यांच्या सहभागाने या सोहळय़ाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले. श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ८ एप्रिलपासूनच या सोहळय़ाचा प्रारंभ झाला होता. ११ एप्रिल रोजी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत रामायण स्वाहाकार यागाची सुरुवात झाली होती. त्या यागाची पूर्णाहूती शुक्रवारी सकाळी १0 वा. करण्यात आली. दु पारी श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन झाल्यानंतर ठीक १२ वाजता श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरा तील श्रीरामांच्या मूर्तीसमोर रामजन्माचा पाळणा होऊन भक्तांच्या मुखातून निघणार्या रामनामाच्या जयघोषात रामजन्मोत्सवाचे स्वागत करण्यात आले. दुपारी २ वा. श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज अश्वासह नगर परिक्रमा काढण्यात आली. श्रींच्या पालखी, वारकर्यांना हर हर शिव मंदिर परिसरात किशोर लिप्ते व बसस्थानक परिसरात विश्वस्त किशोरबाबू टांक यांनी सरबत दिले. ठिकठिकाणी वारकर्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भाविकांनी उत्स्फूर्तपणे केली. श्री गजानन भक्त मंडळींनी दरवर्षीप्रमाणे महाप्रसाद व्यवस्था केली होती. श्री गजानन भक्त मंडळ नागपूर, अकोट, शेगाव यांनी दोन दिवस अग्रसेन भवन येथे वारकर्यांना महाप्रसाद व्यवस्था केली होती. नागपूर टिमकीच्या भक्तांनी वारकर्यांचे जोडे, चपला ठेवण्याची विनामूल्य व्यवस्था केली. शनिवार, १६ एप्रिलला सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहंडी, गोपाल काला होऊन यात्रेची सांगता होईल.
संतनगरी राममय!
By admin | Published: April 16, 2016 2:03 AM