लोकमत न्यूज नेटवर्ककिनगावराजा: आज लग्नसमारंभ म्हटले की हार तुरे, भाषणे आणि स्वागत समारंभ पाहायला मिळतात; पण या सर्व गोष्टीला फाटा देत जायभाये परिवाराने समाजात वेगळा पायंडा पाडण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आणि लग्नसमारंभास आलेल्या पाहुण्यांना रोपट्याचे वाटप करून ‘पर्यावरण बचाव’चा संदेश दिला.१५ मे रोजी किनगाव राजा येथील डॉ. शिवानंद जायभाये रा. सावखेड तेजन यांचे कनिष्ठ बंधू आणि लोकनेता प्रतिष्ठानचे सदस्य भारत जायभाये यांचा लग्नसोहळा देऊळगावराजा येथील दीनदयाल महाविद्यालयात संपन्न झाला. सध्या आपण सर्व पाणी व दुष्काळाचा सामना करत आहे. या गोष्टीचा या परिवाराने सकारात्मक विचार करून येणाऱ्या पाहुण्यांचे हार-तुरे न देता समाजात वृक्षाचे महत्त्व वाढावे आणि लोकांनी वृक्षारोपण करावे, याला चालना मिळावी म्हणून आलेल्या पाहुण्यांना चिक्कूच्या कलमा भेट देऊन समाजात एक वेगळा संदेश दिला. प्रातिनिधिक स्वरूपात ५० वृक्ष कलम देऊन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. येत्या जून महिन्यात पर्यावरण सप्ताहात सावखेड फाटा ते सावखेड गावापर्यंत भारत जायभाये व पूजा जायभाये यांच्या विवाहप्रीत्यर्थ जायभाये परिवार वृक्षारोपण करणार असल्याचे डॉ. शिवानंद जायभाये यांनी सांगितले. खरे तर असाच संदेश घेऊन लोकांनी पर्यावरण जपण्याचा प्रयत्न अशा समारंभातून केला तर भविष्यात पाणी संकटाला तोंड देण्याचे काम पडणार नाही, एवढे मात्र नक्की. या लग्नसोहळ्यातील आलेल्या प्रत्येक आप्तस्वकीय, मित्र परिवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
लग्नसमारंभात रोपटे वाटप करून दिला ‘पर्यावरण बचाव’चा संदेश
By admin | Published: May 20, 2017 12:21 AM