लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अनेक इच्छुकांना सरपंचपदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा लागली हाेती. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केल्यानंतर प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. तीन टप्यात सरपंचपदाची निवडणूक घेण्यात येणार असून ९, १० आणि ११ फेब्रुवारी राेजी हाेणार आहे. जिल्ह्यातील सन २०२० ते २०२५ दरम्यान गठित हाेणाऱ्या ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण तालुका स्तरावर जाहीर करण्यात आले आहे. तसेच महिला आरक्षण जिल्हास्तरावर जाहीर करण्यात आले आहे. सरपंचपदाच्या आरक्षणानंतर नुकत्याच निवडणुका झालेल्या ५२७ ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये सरपंचपदासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर काहींना धक्का बसला तर काहींना संधी मिळाली. महिला आरक्षणही जाहीर झाल्यानंतर आता सरपंचपदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. सरपंचाची थेट निवडणूक रद्द करण्यात आल्याने यावेळी ग्रामपंचायत सदस्यांना माेठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे, अनेक गावातील नवनिर्वाचित सदस्य सहलीवर रवाना झाले आहेत. ज्या गावांमध्ये दाेन्ही पॅनलला समान जागा मिळाल्या तेथे सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. बहुतांश गावांमध्ये चित्र स्पष्ट असल्याने तेथे सरपंच काेण हाेईल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. माेठ्या ग्रामपंचायतींमध्ये काही ठिकाणी अपक्षांच्या हाती सत्तेची चावी आल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी असूनही आरक्षण निघालेला सदस्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे,अशा ठिकाणी बहुमत नसतानाही सरपंचपद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निघालेले एकमेव सदस्य असल्याने त्यांचा सरपंचपदाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र आहे. काही गावांमध्ये आरक्षण निघालेले सदस्यच नसल्याने पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने सरपंचपदाची निवडणूक घेण्याची तयारी पूर्ण केली असून लवकरच तारखांची घाेषणा करण्यात येणार आहे.
तीन दिवस चालणार निवडणूक ज्या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींची संख्या जास्त आहे, त्या तालुक्यामध्ये ९, १० आणि ११ फेब्रुवारी राेजी निवडणूक हाेणार आहे. तसेच नियाेजन करण्यात आले असून प्रशासनाकडून लवकरच अधिकृत तारखांची घाेषणा हाेणार आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी इच्छकांनी माेर्चेबांधणी केली आहे.
माेठ्या ग्रामपंचायतींवर राजकीय पक्षांचे लक्ष जिल्ह्यातील १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचातींवर राजकीय पक्षांचे लक्ष राहणार आहे. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. त्यामुळे, सरपंच निवडणुकीत काेणाला यश मिळते याकडे लक्ष लागले आहे.