बुलडाणा : बनावट कागदपत्रांच्या आधारे खातूनबी सैयद गफ्फार यांनी धाड येथील सरपंचपद मिळवल्याचा आराेप समाजसेवक अब्दुल मुनाफ यांनी २ मार्च राेजी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी विविध कागदपत्रे सादर केली.
धाडचे सरपंच पद हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले होते. धाड येथील विद्यमान सरपंच खातूनबी सैयद गफ्फार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र.४ मधून ग्रामपंचायत सदस्या म्हणून विजय मिळविला आहे. खातून बी सैयद गफ्फार या मूळच्या धाड येथील आहेत. मात्र महार जातीचे प्रमाणपत्र दाखवून त्यांनी सरपंचपद मिळवले असून त्यांनी खोटे दस्तावेज जोडून महार जातीचे असल्याचा दावा केला आहे. तसेच हे प्रमाणपत्र जालना येथून मिळविलेले आहे. या प्रकरणी विविध स्तरावर माहितीचा अधिकाराचा वापर करुण माहिती गोळा केली असता हे प्रमाणपत्र बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारावर घेतल्याची माहिती समोर आल्याची माहिती अब्दुल मुनाफ यांनी दिली आहे. या महिलेने प्रशासनाची व निवडणूक आयोगाची दिशाभूल करुन हे महार जातीचे प्रमाणपत्र सादर करत खऱ्या महार उमेदवारावर अन्याय केल्यामुळे सरपंच व या प्रकरणात सामील असलेल्या लोकांवर खोटे कागदपत्रे तय्यार करण्याचा व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमाने अब्दुल मुनाफ इंजिनियर यांनी केली आहे. तसेच या बाबतची तक्रार प्रमोद वाघुर्डे यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला धाड येथील भगवान तायडे, प्रमोद वाघुर्डे,टिका खान,डिगांबर जाधव,अनिल कुटे व मो.शकील सौदागर आदि उपस्थित होते.
शाळेच्या स्थापनेपूर्वीच दाखवला प्रवेश
खातून बी सैयद गफ्फार यांनी भारती बाबुराव लहाने या नावाने मराठी प्राथमिक शाळा गाेला ता.अंबड जि.जालना येथील निर्गम उतारा लावला आहे. त्यामध्ये प्रवेशाचा दिनांक २३ जुलै १९८३ अशी दिली आहे. माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता या शाळेची स्थापनाच १९८५ मध्ये झाल्याचे समाेर आल्याचे अब्दुल मुनाफ इंजिनियर यांनी सांगितले.
जन्मापूर्वी केला विवाह
भारती बाबुराव लहाने यांची जन्म तारीख निर्गम उताऱ्याप्रमाणे १ जानेवारी १९७७ दाखवण्यात आली आहे. तिने भारती ऊर्फ खातून बी हीने सय्यद गफ्फार सय्यद रहीम यांच्याशी १ एप्रिल १९६६ ला विवाह केल्याचे निकाहनामा अर्जासाेबत जाेडला आहे. यामध्ये जन्माच्या दहा वर्षापूर्वी लग्न केल्याचे दाखवण्यात आले आहे.