बुलढाणा : शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे चिखली तालुक्यातील अमडापूर येथील सरपंच वैशाली संजयकुमार गवई यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यपदासाठी अपात्र घाेषित केले आहे. याविषयी आदेश २६ एप्रिल राेजी जारी करण्यात आले आहेत.
अमडापूर येथील सरपंच वैशाली गवई यांच्याविरुद्ध विनाेद हरिभाऊ वानखेडे, मधुकर बन्सीराम मिसाळ आणि गजानन नारायण वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली हाेती़ या तक्रारीत वानखेडे यांनी सरपंच गवई यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा आराेप केला हाेता़ तसेच पाणंद रस्ता अडवला हाेता. याविषयी निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र सादर करताना ही बाब लपवून ठेवल्याचा आराेपही विनाेद वानखेडे व इतरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत केला हाेता़ याप्रकरणात दाखल कागदपत्रे, दाेन्ही पक्षांचे लेखी जबाब, युक्तिवाद , ग्रामपंचायत सचिव, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त अहवालानंतर सरपंच वैशाली गवई व त्यांच्या कुटुंबीयांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले़ त्यामुळे, अपर जिल्हाधिकारी यांनी अमडापूरच्या सरपंच तथा ग्रा़ पं. सदस्य वैशाली संजय गवई यांना अपात्र घाेषित केले आहे़.
सरपंचपतीही झालेे अपात्र
अमडापूरच्या सरपंच वैशाली गवई यांचे पती संजय गवई हे सुद्धा ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. त्यांच्याविरुद्धही विनाेद वानखेडे व इतरांनी तक्रार दाखल केली हाेती. यामध्येही शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनाही सदस्यपदावरून अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घाेषित केले आहे.