धाड (जि. बुलडाणा): गेल्या काही वर्षांपासून येथील उर्दू माध्यमिक शाळेच्या समस्या जिल्हा परिषद बुलडाणा यांनी ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊनही सोडवल्या नाहीत. याबाबत प्रशासनाचा निषेध करून धाड सरपंच व ग्रामस्थांनी २६ जानेवारीला शोले आंदोलन केले. धाड येथे काही दिवसांपूर्वी उर्दू शाळा आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या समस्यांबाबत सरपंच रिझवान सौदागर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद गुजर, म.शफीक अ.रफीक आणि ग्रामस्थांनी दोन्ही विभागास निवेदन देऊन समस्या सोडवण्याची मागणी केली आणि २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार सरपंच रिझवान सौदागर, अरविंद गुजर, म.शफीक अ.रफीक यांनी येथील एका मोबाइल टॉवरवर चढून ह्यशोले स्टाईलह्ण आंदोलन केले. प्रजासत्ताकदिनी अभिनव आंदोलन छेडल्याने संबंधित विभागाने आंदोलनाची दखल घेतली. बीडीओ राजेश लोखंडे यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन गावकर्यांशी चर्चा केली. यावेळी नागरिक व युवकांनी प्रचंड रोष व्यक्त करीत घोषणाबाजी केली. धाड ग्रामीण रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात रुजू झालेले डॉक्टर मारोडकर यांनी घटनास्थळी भेट दिली असता, त्यांना नागरिकांनी घेराव टाकून आपला संताप व्यक्त केला. वस्तुत: जि.प.उर्दू हायस्कूल येथे मूलभूत सोयीच नाहीत, तर ग्रामीण रुग्णालयात पदे रिक्त असल्यामुळे आंदोलन करण्यात आले. यावेळी बीडीओ लोखंडे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोनटक्के यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या ठिकाणी ठाणेदार व त्यांच्या सहकार्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
सरपंचाचे ‘शोले स्टाईल’आंदोलन!
By admin | Published: January 28, 2016 12:21 AM