ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गर्भवती महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी आय-डी क्रमांक अनिवार्य करण्यात आला असून, त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद करणे आवश्यक आहे; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्यास नियमांवर बोट ठेवून या महिलांना सासर किंवा माहेरचा रस्ता दाखवला जात आहे. या नियमामुळे सोनोग्राफीसाठी गर्भवती महिलांची हेळसांड होत आहे. सोनोग्राफीच्या माध्यमातून गर्भपात, स्त्रीभ्रूण हत्या किंवा लिंगभेद चाचण्यावर आळा घालण्यासाठी माता संरक्षण कार्ड व आधार कार्डची झेरॉक्स असल्याशिवाय गर्भवती स्त्रीची सोनोग्राफी कायद्यानुसार करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना दिले आहेत. त्यामुळे माता संरक्षण कार्ड म्हणजे आय-डी क्रमांक असल्याशिवाय गर्भवती महिलांची सोनोग्राफी कुठल्याच सोनोग्राफी केंद्रावर करण्यात येत नाही. सदर क्रमांक जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्राप्त होतो. गर्भवती महिला आय-डी क्रमांकासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्यास त्यांना त्या जेथे राहतात (सासर-माहेर) तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाण्याचा सल्ला दिला जातो. जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीनिमित्त राहणार्या कुटुंबातील गर्भवती महिलांना आय-डी क्रमांकासाठी गर्भावस्थेत सासरी किंवा माहेरी जाणे शक्य होत नसल्यामुळे त्यांची मोठी अडचण होत आहे.
गर्भावस्थेत पत्करावा लागतो प्रवासाचा धोकागर्भवती महिलांनी प्रवास टाळावा, असा सल्ला डॉक्टरांकडून सुरुवातीपासूनच दिला जातो; मात्र सोनोग्राफी करण्यासाठी लागणार्या आय-डी क्रमांकाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहेरगावच्या गर्भवती महिलांची नोंद करून घेतल्या जात नाही. त्यामुळे शहर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीनिमित्त राहणार्या गर्भवती महिलांना दुरवर असलेल्या सासर किंवा माहेरला जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे सोनोग्राफीच्या आय-डी क्रमांकासाठी काही गर्भवती महिलांना गर्भावस्थेत प्रवासाचा धोका पत्करावा लागत आहे.
अनेक गर्भवती महिलांची सोनोग्राफी बाकीच! गर्भवती महिलांना दोन ते तीन महिन्यातून एकदा सोनोग्राफी करण्याचे डॉक्टरांकडून सांगितल्या जाते; मात्र बाहेरगावच्या महिलांना सोनोग्राफीसाठी आय-डी क्रमांक मिळविणे अवघड जा त असल्याने अनेक गर्भवती महिलांची सोनोग्राफी करणे बाकी राहत आहे. एखाद्या गर्भवती महिलेची तत्काळ सोनोग्राफी करायची असल्यास त्यांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागतो.
आर.सी.एच.पोर्टल आय-डी नंबर असल्याशिवाय गर्भवती महिलांची सोनोग्राफी होत नाही. गर्भवती महिला जेथे राहतात ते थील प्राथमिक आरोग्य केंद्रातून आय-डी नंबर प्राप्त करावा.- डॉ.सरिता पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा. -