- नानासाहेब कांडलकरजळगाव जामोद : रामेश्वरम येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘स्पेस रिसर्च पेलोड व क्युब्ज चॅलेंज २०२१’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध १०० शाळांच्या प्रत्येकी १० याप्रमाणे १ हजार विद्यार्थ्यांनी १०० उपग्रह तयार केले आहेत. यामध्ये जळगाव जामोद येथील १० विद्यार्थ्यांनी बनविलेल्या दोन उपग्रहांचा समावेश आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता एकाच वेळी रामेश्वरम येथून अवकाशात झेप घेणार असून, अवकाशातील विविध बाबींचा अभ्यास करणार आहेत.
जागतिक स्तरावरील या उपक्रमात तब्बल दोन उपग्रह बनविण्याचा सन्मान जळगाव जामोद येथील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाच्या नववी व दहावीतील १० विद्यार्थ्यांच्या टीमला मिळाला आहे. यानिमित्ताने जळगाव जामोदचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झळकणार आहे. या प्रकारचा उपक्रम देशात व जगात पहिल्यांदाच राबविला जात असल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी दिली. याकरिता विद्यार्थ्यांचे पाचवी ते आठवी, नववी ते दहावी, डिप्लोमा व डिग्री असे तीन गट तयार करण्यात आले. प्रत्येक १० विद्यार्थ्यांच्या चमूने एक उपग्रह तयार केला आहे.या विद्यार्थ्यांनी जगातील सर्वांत कमी म्हणजे २५ ते ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह तयार केले. या उपग्रहांना अवकाशात ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर ‘हाय अल्टिट्यूड सायंटिफिक बलून’द्वारे प्रस्थापित केले जाणार आहे. एका किट्समध्ये हे १०० उपग्रह फिट केले असतील. या किटसोबत पॅराशूट, जी.पी.एस., ट्रॅकिंग सिस्टिम, लाइव्ह कॅमेरा जोडलेला असेल. अवकाशातील या उपग्रहांची झेप विद्यार्थ्यांना आपल्या घरीच बसून पाहता येणार आहे. हवेतील प्रदूषण ओझनच्या थराचे प्रमाण, शेती उपयोगी स्थिती यासह विविध बाबींचा अभ्यास हे १०० उपग्रह करणार आहेत.
राज्यातील तब्बल ३७५ विद्यार्थ्यांचा सहभाग
महाराष्ट्राचा सहभाग सर्वांत मोठा१०० उपग्रह बनविणाऱ्या एक हजार विद्यार्थ्यांमध्ये तब्बल ३७५ विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. यापैकी १५० विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. जिल्हा परिषद शाळांपासून विविध शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे.
सातपुड्याचा शंख निनादणार विश्व स्तरावर
स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे अध्यक्ष अॅड. गिरीश माळपांडे यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना या उपक्रमात सहभाग नोंदविण्याबाबत प्रोत्साहित केले. प्रणीत विलास हागे, देवयानी रवींद्र इंगळे, राज रामेश्वर पारस्कर, भूषण संतोष देशमाने, श्रृष्टी रवींद्र गावंडे, प्रांजल वासुदेव उगाळे, तेजस्विनी मधुकर ताठे, ओम सोनाजी हागे, वेदांत अरविंद आगरकर व आर्या दिलीप राठी या दहा विद्यार्थ्यांनी ‘बीएमपी व डीएचटी ११’ असे दोन उपग्रह बनविले. हे उपग्रह ओझोन लेअर, कार्बनडाय ऑक्साइड, हवा किती शुद्ध व प्रदूषित आहे, याची माहिती पुरविणार आहे.